आपत्ती व्यवस्थापनाचे दुर्लक्ष…नागरिकांच्या जीवावर उठले…पूर्वसूचना दिलीच नाही…प्रशासनाची तोकडी मदत…कोट्यवधींचे नुकसान

भंडारा – मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिक पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. जिल्हा आपत्ती प्रशासनाने पुराची पूर्वसूचना दिली नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांवर मोठे संकट ओढविले आहे. अनेक गावांना पाण्याने वेढले असून शेकडो नागरिक अजूनही पुरात अडकले असताना काही ठिकाणचा अपवाद वगळता अनेकांपर्यंत प्रशासनाची मदत पोहचली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे.

मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणे ओव्हरफ्लो झालीत त्यामुळे संजय सरोवर धरणाची दारवाजे उघडण्यात आली. यासह पुजारीटोला व कालीसागर यांचेही पाणी सोडल्याने त्याचा फटका हा भंडारा जिल्ह्याला बसला. या सरोवराचे पाणी सोडल्यानंतर जिल्ह्याला पूर येईल आणि त्याचा किती भागाला फटका बसेल, याची किंचितही पूर्वसूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना दिली नाही.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचा हाच हेकेखोरपणा भंडारा जिल्हावाशीयांच्या अक्षरशः जीवावर उठला असून नागरिक महापुरात अडकले आहे. शनिवारला सायंकाळपासून पुराचे पाणी शहरासह ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पोहचले. याची कल्पना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहे.

रविवारला सकाळपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा घातला. तरीही आपत्ती व्यवस्थापनाकडून पुराच्या सतर्कतेचा इशारा दिला नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच स्थलांतरणाचा मार्ग अवलंबून साहित्य इतरत्र हलविले. मात्र, अनेक ठिकाणी याला फार उशीर झाल्याने गृहपोयोगी सहित्याची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली.

रविवारला दुपारनंतर पुराच्या पाण्यात वाढ होत होती, त्यामुळे दिवसभर नागरिक या प्रश्नाबाबत चिंतीत होते. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींसह नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नामदास यांच्याशी सम्पर्क साधला, मात्र, त्यांनी नागरिक आणि माध्यमालाही प्रतिसाद न देता पुराची माहिती दिली नाही. त्यामुळे, भंडारा जिल्ह्यात उद्भवलेल्या या पूरपरिस्थितीला केवळ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

या महापुरामुळे नागपूर – कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ बंद झाला आहे. त्यामुळे भंडाऱ्याचा नागपूर आणि अन्य जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. यासोबत जिल्ह्यांतर्गत अन्य राज्यमार्ग सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहे. तर, गोसे धरणाचे ३३ दरवाजे उघडले असून यापैकी १३ दरवाजे पाच मीटरने तर २० दरवाजे साडेचार मीटरने सुरू आहेत. यातुन ३० हजार ११६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. या पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील ५८ गावातील दोन हजार ६६४ कुटुंब बाधित झाल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे.

पुरामुळे फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली असून मदतकार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पूरपरिस्थितीमध्ये अजूनही बरेचसे नागरिक त्यांच्या घरी अडकलेले आहेत. तर, काही नागरिकांना पोलिसांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर काढले आहे. मात्र, या लोकांची व्यवस्था ही प्रशासनातर्फे होत नसल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

महापुरामुळे नागरिकांच्या निवास आणि भोजनाची बिकट अवस्था झाली आहे. शेकडो घर जमीनदोस्त झाली आहे. पुरात जनावरे, पशुपक्षीही वाहून गेलीत तर अन्नधान्याची नासाडी झाली. शेकडो हेक्टरमधीक पिके पाण्याखाली आहे. या महापुरामुळे भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहिती आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नामदास यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here