कोल्हापूरातील रोजी चित्रदुर्ग मठ, दसरा चौक येथे धम्मज्ञान शिबीर संपन्न…

राहुल मेस्त्री

रविवार दि. २१/११/२०२१ रोजी चित्रदुर्ग मठ, दसरा चौक कोल्हापूर येथे युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र, कर्नाटक राज्य आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय धम्मज्ञान शिबीर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन यु.बौ.ध.प.राज्य सचिव आयु. सतिश भारतवासी यांनी केले तर दिपप्रज्वलन यु.बौ.ध.प. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आयु. बापूसाहेब राजहंस यांनी केले.

पहिल्या सत्रात आयुनी. अनिता गवळी यांनी “महिलांना बौद्ध धम्म आपला वाटावा यासाठी कोणते कृतिकार्यक्रम करणे आवश्यक आहे? या विषयावर बोलतांना बुद्ध विहार मधील कार्यक्रमात महिलांचा सहभाग, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीचे कार्यक्रम हाती घेणे, समता केवळ पुस्तकात आणि बोलण्यापुरती नको तर ती व्यवहारात उतरविण्याचे कार्यक्रम घराघरांतून सुरू व्हायला हवेत इत्यादी मुद्द्यांवर सखोल विवेचन केले.

“धर्मांतर करुनही बौद्ध प्रभाव कोणत्याही क्षेत्रात का दिसुन येत नाही तो दिसण्यासाठी कोणते कृतिकार्यक्रम घ्यावे लागतील?” या विषयावर बोलतांना आयु. सतीश भारतवासी यांनी ६५ वर्षांतील धम्म चळवळीच्या इतिहासातील बाबी, विविध सामाजिक आणि धम्म संघटना यांच्यातील समन्वयाबाबतचा प्राथमिक आराखडा,

जबरदस्तीने कोणतेच परिवर्तन होत नाही त्यासाठी तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली साधने अभ्यासपूर्वक उपयोगात आणली पाहिजेत यावर मांडणी करत धम्म शिबिर मठात (एका विशिष्ट श्रद्धास्थानी) घेणे यातील सकारात्मकता, बुद्ध आणि बसवण्णा यांची वैचारिक नाळ कशी जोडली गेली आहे.

इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. “युवा वर्गात सध्या कोणते विचार प्रवाह आहेत आणि त्यांना बौद्ध धम्म शिकविणारे कृतिकार्यक्रम कसे घ्यावेत?” या विषयावर बोलतांना आयु. डॉ. संतोष भोसले यांनी धम्मचर्चा, वेळोवेळी एकत्र येणे, श्रद्धास्थानांचा प्रचार विहारातून होणे, धम्मनिनाद काव्य महोत्सव, कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा इत्यादी कृतीकार्यक्रमाचे परिणाम, ज्येष्ठ आणि युवक यातील सुसंवाद, युवा बौद्ध च्या एकूण कार्याचा आढावा, वाटचाल इत्यादी मुद्द्यावर मांडणी केली.

प्रा. किरण भोसले, संस्थापक अध्यक्ष, यु.बौ.ध.प. यांनी “प्रचारक व बौद्ध उपासक यांनी कृतिकार्यक्रम रुजविण्यासाठी काय करावे?” या विषयावर बोलतांना म्हणाले, “प्रचारक व उपासक यांनी प्रथम स्वतःची क्षमता ओळखावी आणि स्वतःकडे जे कांही कौशल्य आहे त्याचा उपयोग करुन धम्म प्रचारास सुरुवात करावी. छोटे छोटे कृतिकार्यक्रम हाती घेवून सर्वसामान्य लोकांना धम्माशी जोडण्याचे प्रयोग करत रहावेत.

पंचशील ही शेवटची डिग्री असून आपण पहिली इयत्तेत येवू इच्छीणाऱ्यांकडून तिचे पालन अपेक्षित धरु नये तर पहिल्या इयत्ते पासून डिग्रीची तयारी करण्यासाठी सर्वांना संधी द्यावी, मदत व सहकार्य करावे, हे सर्व काम कल्याणमैत्री बाळगून व वाढवून शक्य असल्याने लोकांशी जिव्हाळा वाढवण्यासाठी कल्याणमैत्रीचे सर्व पैलू उपयोगात आणावेत, कर्मकांड विरुद्ध ज्ञानकांड या लढाईत आपण ज्ञानकांडाच्या प्रवाहाचे पाईक होऊन माणसे जोडणारे तंतू प्रचार प्रसारात आणूया”.असे मार्गदर्शन केले.

या शिबिरात सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला, आयु. डॉ. विकास पाटील यांनी प्रबोधन पुस्तक एक्स्प्रेसमार्फत धम्मसेवा दिली. याप्रसंगी विकास कांबळे,सुदर्शन तुळसे,मंदाताई सोनताटे , मुक्ताताई भास्कर, प्रदिप सातपुते ,दिक्षम कांबळे, जयश्री सोरटे, धनश्री ढाले, कनिष्क गवळी,संदीप खांडेकर, राजानंद तायडे, चेतन रोकडे, सिध्दार्थ भोसले, चित्रदुर्ग मठात राहणारे काही विद्यार्थी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here