श्रीक्षेत्र गुप्त गंगा येथे ऋषीपंचमी निमित्य भाविकांची मांदियाळी…

मंदिरातील मूर्त्यांच्या आकर्षक पुष्प सजावटीने भाविकांचे मनमोहिले…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

आज ऋषीपंचमी निमित्य परिसरातील श्री क्षेत्र गुप्तगंगा देवस्थान येथे भाविकांची मांदियाळी आज सकाळ पासूनच भाविकांनी येथील गुप्त गंगेत अंघोळ करून भगवान शंकराचे पुजा अर्चना करून दर्शन घेतले.यावेळी मंदिरात हिरव्या पानांचे मंडप टाकून मंदिरातील मूर्त्यांची आकर्षक पुष्प सजावटीने भाविकांचे मनमोहून घेतले होते.ही पुष्प सजावट रामटेक येथील नागद्वार भक्तांनी केली होती.तसेच त्यांनी कढईचा प्रसाद करून भाविकांना वितरण करण्यात आला.

श्री क्षेत्र गुप्तगंगा येथे गुप्त पाण्याचे पाच झरे सतत वाहत असतात.पांडव अज्ञात वासात असतांना या ठिकाणी काही दिवस त्यांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे.तसेच भगवान राम वनवासात असतांना चित्रकूट वरून रामटेककडे जात असतांना  गुप्तगंगा या तीर्थ क्षेत्रावरून गेले. अशीही भाविकांची मान्यता आहे.तसेच या झऱ्यातील पाण्यांनी सतत सव्वा महिना अंघोळ केली तर चर्म रोग नाहीसा होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.

ऋषिपंचमीचा दिवस व्रत ठेवण्यासाठी फलदायक असतो. पौराणिक मान्यतांच्या अनुसार ऋषिपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी केल्यास त्यांना सुख-शांती आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते. या दिवशी गंगास्नानाचेही महत्व असते. महिला यादिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सुख, शांती आणि समृद्धीसाठी हे व्रत करतात. यात पूजा केल्यानंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकली जाते आणि पंडितांना भोजन देऊन व्रताचे उद्यापन करण्यात येते. अविवाहित स्त्रियांसाठीही हे व्रत महत्वपूर्ण आणि फलदायी मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here