जिल्हा उपनिबंधक कहाळेंकरांवर कार्यवाहीची मागणी. आकोट कृऊबासच्या चौकशीस विलंब केल्याचा आरोप. ही चौकशी वर्ग-१ अधिका-याकडून करविण्याचीही मागणी…

संजय आठवले, आकोट.

आकोट कृऊबास प्रशासकांच्या गैरकारभाराची चौकशी लावण्यास विलंब करुन गैरकारभाराचा ठपका असलेल्याना कागदपत्रामध्ये बदल करण्याकरिता संधी देणे तथा विलंबाने केलेला हा चौकशी आदेश बाजार समिती कायद्यानुसार न करणे ह्या वर्तनाकरिता जिल्हा निबंधक व्ही.डी. कहाळेकरांवर कार्यवाही करण्याची मागणी माजी आमदार संजय गावंडे यानी पणन संचालक पूणे यांचेकडे केली आहे.

तर दुसरीकडे आकोट कृऊबास प्रशासकांची चौकशी वर्ग-१ अधिका-यामार्फत करविण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आली आहे. सोबतच सद्यस्थितीत पारीत चौकशी आदेश बाजार समिती कायद्यानुसार नसल्याने कायदा संमत चौकशी आदेश नव्याने करण्याचीही मागणी संजय गावंडे यानी केली आहे.

शेतकरी पैनल नेता, पूर्व विधायक संजय गावंडे, डॉ. गजानन महले, प्रदीप वानखड़े, डॉ. प्रमोद छोरे, प्रमोद खंडारे, एड. मनोज खंडारे, बद्रुज्जमा यानी दि. २२.०४.२०२२ रोजी जिल्हा उपनिबंधकाकडे आकोट कृऊबास प्रशासकांच्या गैरकारभाराची तक्रार केली होती. गैरकारभाराचा ठपका असणाराना कागदपत्रांमध्ये बदल करण्याची संधी मिळू न देण्यासाठी या तक्रारीवर तत्काळ चौकशी लावणे अगत्याचे होते. मात्र उपनिबंधक कहाळेकर यानी हा आदेश पारीत करण्यास विलंब केला.

त्याने आकोट कृऊबास प्रशासकाना कागदपत्रात हवा तसा बदल करण्यास पूर्ण संधी मिळाली. ह्यासोबतच कहाळेकर यानी विलंबाने पारीत केलेला हा चौकशी आदेश अपूर्ण व बाजार समिती कायद्यानुसार नाही. हा आदेश बाजार समिती कायदा कलम ४० ब नुसार करणे अनिवार्य होते. असे केल्याने या आदेशाला कायदेशिर अधिष्ठान प्राप्त झाले असते. त्यामूळे चौकशीतील दोषी लोकाना आपल्या बचावाची पळवाट काढता आली नसती.

परंतु सद्यस्थितीत केलेला हा चौकशी आदेश कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत नाही. कारण ह्या आदेशाला कायद्याचा आधार नाही. त्याने या आदेशाने होणारी ही चौकशी कायदेशिर न होता प्रशासकांसाठी फायदेशिर ठरणार आहे. त्यामूळे आकोट कृऊबास प्रशासकांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा आदेश विलंबाने व कायदा विसंगत पारीत केल्याबद्दल अकोला जिल्हा उपनिबंधक व्ही.डी.कहाळेकर यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी संजय गावंडे यानी पणन संचालक, पूणे यांचेकडे केली आहे.

ह्यासोबतच आकोट कृऊबास प्रशासकांच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे दोन्ही अधिकारी श्रेणी-२ आहेत. आकोट बाजार समिती ही वर्ग-१ ची बाजार समिती आहे ते पाहू जाता व तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेता ही चौकशी वर्ग-१ अधिका-याकडून करविणेच न्यायसंगत आहे.

म्हणून ह्या चौकशीकरीता वर्ग-१ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी संजय गावंडे यानी केली आहे. तसेच सद्यस्थितीत पारित चौकशी आदेश बाजार समिती कायद्यानुसार नसल्याने ही चौकशी पारदर्शी व कायदेशिर होण्यासाठी बाजार समिती कायदा कलम ४० ब नुसार चौकशी करण्याचा आदेश नव्याने पारीत करावा अशीही मागणी माजी आमदार संजय गावंडे यानी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here