यवतमाळ | रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी १५ एप्रिलपर्यंत आदेश लागू…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊनबाबत सुधारीत आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत कलम 144 अन्वये संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात जमावबंदी लागू राहील.

या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशात नमुद आहे. सदर आदेश 28 मार्चपासून 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.आदेशात नमुद केल्याप्रमाणे सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करतांना प्रत्येक व्यक्तिने मास्क घालणे बंधनकारक राहील.

सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्थळी वाहतुकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करावे. एकाच वेळी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. या कालावधीत जास्तीत जास्त लोकांनी घरूनच काम करण्याची सुविधा देण्यात यावी. त्याकरीता कार्यालये, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात.

सर्व प्रकारचे कार्यालये, दुकाने, आस्थापना यांनी कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राकरीता खालील मार्गदर्शक सुचना : जिल्ह्यामध्ये यापूर्वी ज्याप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्राचे वर्गीकरण करण्यात आले आहे, त्यानुसार स्थानिक प्राधिकरणाने प्रतिबंधित क्षेत्राबाबत केलेले आदेश यापुढेही लागू राहतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास त्याबाबत नियमानुसार 14 दिवस विलगीकरणाची कार्यवाही करावी.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत खालील सुचना : रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत कलम 144 अन्वये संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदी लागू राहील. सर्व प्रकारची सार्वजनिक ठिकाणे उदा. उद्याने, बगिचे, पार्क आदी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील.

या नियमाचे पालन न केल्यास प्रत्येक व्यक्तिला स्थानिक प्राधिकरणाने एक हजार रुपये दंड करावा. कोणत्याही व्यक्तिने मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सर्व प्रकारची सिनेमागृहे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, प्रेक्षकगृहे व हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे हे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. या कालावधीत हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे मार्फत पार्सल सुविधेस रात्री 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे.

संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. लग्न समारंभाकरीता 50 व्यक्तिंची व अंत्यविधीकरीता 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत सुरु राहील. परंतु सदर भाजी मंडई मध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

गृह विलगीकरणाबाबत आदेश पुढीलप्रमाणे : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास त्याबाबतची माहिती स्थानिक प्राधिकरणाने त्वरीत घ्यावी. संबंधित रुग्ण पॉझेटिव्ह असल्याबाबतचा फलक त्याच्या घरासमोर ठळकपणे दिसेल, असा लावण्यात यावा. तसेच त्याचा 14 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी त्यात नमुद करावा.

कोरोना पॉझेटिव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांनी बाहेर फिरणे टाळावे. अत्यावश्यक बाबीसाठी बाहेर पडायचे असल्यास मास्कचा वापर करावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तात्काळ कोव्हीड सेंटरमध्ये हलविण्यात येईल.

जमावबंदी कालावधीत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये या आदेशाचे उल्लंघन करणा-या कोणत्याही व्यक्तिविरुध्द संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. सदर जमावबंदीचे आदेश हे 28 मार्चपासून 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here