दुधे दाम्पत्याची वृद्धाश्रमात आगळवेगळी भाऊबीज…!

यवतमाळ – सचिन येवले

दिपावलीच्या शुभ पर्वावर बहीण भावाच पवित्र नातं दृढ करणारा भाऊबीज हा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात येतो. समाजातील वंचित, निराधार व्यक्तींच्या वाट्याला हे क्षण येत नाही, मात्र निराधार वृद्धासोबत दारव्हा येथील दुधे दाम्पत्याने मित्र परिवारा सोबत भाऊबीज साजरी करून आदर्श निर्माण केला.

आज समाजात रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा पाहायला मिळतो.मात्र दारव्हा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक संजय दुधे व सौ.रेखा दुधे यांनी उमरी पठार येथील संत दोला महाराज वृध्दाश्रमात आगळंवेगळं नातं निर्माण केलंय.

भावा बहिणीचा पवित्र सण भाऊबीजचं औचीत्य साधुन वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना सौ. रेखा ताईंनी ओवाळून मोठ्या मायेनं भेटवस्तू प्रदान केल्या .त्या बहिणीची वेडी माया व जिव्हाळा वृद्धांना सुखावून गेला. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांनी वृद्धाश्रमात नियमित सेवा देणारे संजय दुधे यांना ओवाळले.

त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले.रक्ताचं कुठलही नातं नसतांना निर्माण झालेला ममतेचा ओलावा हृदयस्पर्शी असून प्रेरणादायी आहे.निराधार वंचित वृद्धांसाठी ते क्षण नक्कीच संस्मरणीय ठरले. गत दहा वर्षांपासून दुधे दाम्पत्य वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी करतात.

यावेळी दारव्हा येथील डॉ. एन. डी. ठाकरे व सौ अरुणा ठाकरे यांनी सुद्धा त्यांचे सोबत भाऊबीज साजरी केली. वृद्धाश्रमाचे संचालक सेवाव्रती शेषराव डोंगरे यांनी दुधे व ठाकरे परिवाराचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here