कोरोना पॉझिटिव रुग्णाचा घरीच मृत्यू; लाखांदुरात पत्नीवर गुन्हा दाखल…

आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा.
कारवाईच्या धास्तीने एकमेकांकडे अंगुलीनिर्देश.

भंडारा – कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाबाबत आरोग्य विभागाने हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा घरीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोग्य विभागाने आता सावरासावर सुरू केली आहे. प्रकरण अंगलट येईल या भीतीने आरोग्य विभागाने रुग्णाच्या पत्नी विरोधातच पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सोबतच आरोग्य यंत्रणेने नगरपंचायतकडे अंगुलीनिर्देश करून उर्वरित जबाबदारी त्यांची असल्याचे खापर फोडले आहे. लाखांदूर येथे घडलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लाखांदूर येथील विष्णू नामक एका व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने कुटुंबीयांनी त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाची कोरोना तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला.

यामुळे डॉक्टरांनी रुग्णाला भंडारा येथील कोविड केंद्रावर भरती करण्याचा सल्ला दिला. यासाठी कुटुंबीयांना रेफर स्लिप दिली. मात्र, रुग्णवाहिका नसल्याचे कारण सांगून सदर रुग्णाला खाजगी वाहनाने भंडाऱ्याला नेण्याचा तोंडी सल्ला दिला. मात्र, रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने कोणताही वाहनचालक सदर रुग्णाला भंडाऱ्याला नेण्यासाठी तयार नव्हता.

त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण अत्यवस्थ असल्याने मृत्यू अटळ असल्याने भंडाऱ्याला नेण्यापेक्षा घरीच घेऊन जा, असा तोंडी आदेश डॉक्टरांनी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे रुग्णाला घरी आणले असता दुसऱ्या दिवशी रुग्णाचा उपचाराअभावी घरीच मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह रुग्णाचा घरीच मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याने प्रशासनासह आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याची तातडीने दखल घेत आरोग्य विभागाला स्पष्टीकरण मागितले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून हातवर केले आहे.

कोरोना रुग्णाची माहिती शासकीय पोर्टलवर जाहीर करून नगरपंचायत मुख्याधिकारी यांना माहिती दिली. मात्र, नगरपंचायतने याकडे लक्ष दिले नसल्याचे आरोग्य विभाग सांगत सुटले आहे. जिल्हाधिकारी कदम यांनी विचारणा केल्याने प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा एकमेकांवर खापर तर फोडत नाही ना?

असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी लाखांदूरचे तहसीलदार यांनी वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असून, डॉक्टरांनी मृतकाच्या पत्नीसह कुटुंबीयांचा दोष दाखवीत त्यांच्याविरुद्ध लाखांदूर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणी नागरिकांनी ही पुढीलप्रमाणे प्रश्न उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाला रेफर स्लिप का देण्यात आली?

रुग्णाला भंडाऱ्याला रेफर केले होते, तर तो तिथे पोहचला की नाही? याची माहिती घेणे आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नव्हती का? पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेण्याची जबाबदारी कुणाची? दोन दिवस पॉझिटिव्ह रुग्ण घरी अखेरचा स्वास घेत होता, तेव्हा आरोग्य विभाग झोपला होता का? पॉझिटिव्ह रुग्णाबाबत लाखांदूर आरोग्य यंत्रणेने नक्कीच हयगय केली?

मग, मृतकाची पत्नी याला दोषी कशी? यात आरोग्य यंत्रणा जबाबदार का नाही? मृतकाच्या पत्नीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो, मग आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा का दाखल होऊ शकत नाही? पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी वाहनाने नेता येते का? रुग्ण घरी मृत पावल्याने अनेकजण संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह झाले असतील, त्याला मृतकाची पत्नीसह कुटुंबियचं जबाबदार की, आरोग्य यंत्रणा ही जबाबदार?

रुग्ण मृत पावल्यानंतरच आरोग्य विभागाला जाग कशी आली? पॉझिटिव्ह रुग्णाला जेव्हा घरी घेऊन जाण्याचा नातेवाईकांना साला देण्यात आला तेव्हा व रुग्णाबाबत हयगय करण्यात आली नाही का?कोविड-१९ चे नियम आरोग्य यंत्रणेला माहीत नव्हते का? या रुग्णाबाबत हा निष्काळजीपणा कुणी केला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

रुग्णाची कोविड चाचणी घेतली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना भंडाऱ्याला कोविड केंद्रावर नेणार असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. कोरोना रुग्णाला नेणारे वाहन बोलाविले मात्र, ते यायला उशीर होता. रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने कुटुंबीयांनी स्वतःच खासगी वाहनाने रुग्णाला भंडाऱ्याला नेत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना रेफरस्लिप देण्यात आली.

मात्र, त्यानंतर रुग्णाला घरी नेले, याची कल्पना कुटुंबीयांनी दिली नाही. कोरोना रुग्णाची माहिती नगरपंचायतला देण्यात आली. त्यामुळे घराला सील करणे आणि त्या रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेण्याची व त्यांना क्वांरंटाईन करण्याची जबाबदारी नगरपंचायतची होती. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

डॉ. सुनील रंगारी
वैद्यकीय अधिकारी,
ग्रामीण रुग्णालय लाखांदूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here