रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव…नगरधन येथील तरुण आढळला पाॅझिटिव्ह

नगरधन येथील एकोणतीस वर्षिय तरूण कोरोना बाधित….गर्भवती पत्नी निगेटिव्ह ,१० जण केले होम क्वारंटाईन

राजू कापसे
रामटेक

नगरधन येथून आज तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला.पुण्यावरून आलेल्या २९ वर्षिय तरूणाचा अहवाल आज “पाॅझिटिव्ह” आल्याने नगरधन येथे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले.विशेष म्हणजे सदर तरूणाच्या गर्भवती पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला.तरूण राहात असलेला माळीपुरा परिसर सिल करण्यात आला असून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्याची कार्यवाही रात्री ऊशिरापर्यंत सुरू होती.तरूणाला नागपुरला मेडिकल रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याचेवर उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यातील रामटेक तालुका आतापर्यंत कोरोनामुक्त होता.मात्र नगरधन येथील तरूण पुण्यावरून २३ तारखेला चिचाळा व नगरधन येथे आला.पुण्यातील एका बॅंकेत अधिकारी असलेला तरूण आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन विमानाने नागपुरला आला.तेथून एका स्काॅर्पिओ गाडीने प्रथम तो नगरधन येथून तीन किमी असलेल्या चिचाळा येथे सासुरवाडीला आला.तेथून मग तो नगरधन येथील आपल्या घरी पोहोचला.उच्चशिक्षित असूनही कोरोना विषाणूविषयीच्या शासनाच्या निर्देशाचे पालन मात्र सदर तरूणाकडून झाले नसल्याची माहिती आहे.

तो स्वतःहून नगरधन येथील आरोग्यकेंद्रात न जाता घरीच राहिला.आरोग्यविभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात माहिती मिळाल्याने त्याला व पत्नीला रामटेक येथील संस्कृत विद्यापिठाच्या कोव्हीड केअर केंद्रात २६ जून रोजी बोलावून त्यांचे घशाचा द्राव तपासणीसाठी नागपुरला पाठविण्यात आला.आज २७ जून रोजी दुपारनंतर सदर तरुणाचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल तालुका आरोग्यविभागाला प्राप्त होताच प्रशासन खडबडून जागे झाले.

उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे,प्रभारी तहसिलदार कुमरे,ठाणेदार दिलीप ठाकूर,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.चेतन नाईकवार ,तलाठी बांगर ,प्राथमिक आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी नगरधनचे सरपंच येथे दाखल झाले.तरूण राहात असलेला किल्ला भागातील माळीपुरा परिसर सिल करण्याची कारवाई करण्यात आली.सदर तरुणाचे घरी किराणा दुकान असून त्याने दुकानात साहित्याची विक्रीही केल्याने परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.त्याचेकडुन त्याच्या पुणे ते नगरधन प्रवासाची माहिती घेण्यात आली.

तसेच कुणाकुणाच्या संपर्कात आला त्याची माहिती घेऊन सदर व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्याची कारवाई करण्यात येत आहे.तरूणाचे आई वडिल,पत्नी,सासु,सासरे यांचेसह एकूण ११ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.तर अधिक माहिती घेण्याची कार्यवाही सुरूच होती.

सदर तरूण आज (२८ जून) रोजी पुण्याला परत जाणार होता अशीहि माहिती मिळाली आहे.प्रशासनस्तरावर लोकांना मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये,साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे,सॅनिटायझेशन करणे ,चेहरा,नाक याला वारंवार स्पर्श न करणे ,गर्दीत जाणे टाळणे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here