कोरोना मृतकांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी…महाव्हॉईसच्या बातमीनंतर केली सुधारणा…जिल्हा माहिती कार्यालयाने काढली दोन प्रसिद्धी पत्रके…

भंडारा – प्रशांत देसाई

भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्याचप्रमाणे मृतकांच्याही आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याची चिंतनीय बाब समोर येत आहे. आज रविवारला जिल्हा माहिती कार्यालयाने याबाबत वेगवेगळी दोन प्रसिद्धी पत्रके काढली. पहिल्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, ‘महाव्हॉईस’ने प्रसारित केलेल्या बातमीनंतर जिल्हा माहिती कार्यालयाने सहा जणांचा मृत्यू झाल्याची सुधारित प्रेमनोट प्रसिद्धीसाठी पाठविली. मात्र, त्यातही एका ६१ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झालेला असताना त्यांचा त्यात समावेश न करता माहिती दडवून ठेवली. यावरून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतकांच्या आकडेवारीत प्रशासनाकडून लपवाछपवी तर करण्यात येत नाही ना? असा संशय सर्वसामान्य नागरिकांमध्ये होऊ लागला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोवीड केंद्रात उपचारादरम्यान मृत पावलेल्यांची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्वाक्षरीने जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी पाठविण्यात येते. मात्र, आज रविवारला मृतकांच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात एकच ‘संशयकल्लोड’ माजला.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने पहिले प्रसिद्धीपत्रक काढले, त्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, ‘महाव्हॉईस’ने बातमी प्रसारित केली. ‘महाव्हॉईस’च्या प्रसारित झालेल्या बातमीत, नोडल अधिकारी लाड यांनी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढलेला असताना प्रशासनाकडून मृतकांची माहिती दडविण्याचा प्रकार होता.

‘महाव्हॉईस’ची बातमी प्रसारित होताच, प्रशासनाला कदाचित त्यांची चूक लक्षात आली असावी. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यांनी काही वेळातचं त्यांची चूक सुधारत नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीसाठी पाठविले. त्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. मृतकांमध्ये एका ६१ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

सदर महिला ही भंडारा शहरातील रहिवासी होती. मात्र, मृतकांच्या माहितीत त्यांचा उल्लेख नाही. मृतकांमध्ये भंडारा तालुक्यातील ३८ आणि ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण, ६१ वर्षीय महिलेची माहिती स्पष्ट केली नाही. त्यामुळे कदाचित मृत्यूचा आकडा हा सात पेक्षा नक्कीच जास्त असावा, असा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या ६१ वर्षीय महिला रुग्णाच्या मृत्यूबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते यांनी स्पष्ट केले होते.

नोडल अधिकारी यांनी सात जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले असताना, प्रसिद्धीसाठी सहा जनांचा आकडा पाठविल्या जातो, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, भंडारा येथे रविवारला १० जणांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती एका समाजमाध्यमावर व्हायरल झाली. या नवीन माहितीत किती सत्यता आहे, माहीत नाही. पण, जर ही माहिती सत्य असल्यास प्रशासनाकडून मृत्यूचा आकडा का लपविल्या जात आहे? हे एक कोडेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here