Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआकोट बाजार समितीवर फडकला काँग्रेसचा झेंडा...सभापती प्रशांत पाचडे तर उपसभापती अतुल खोटरे…आता...

आकोट बाजार समितीवर फडकला काँग्रेसचा झेंडा…सभापती प्रशांत पाचडे तर उपसभापती अतुल खोटरे…आता इंजिनियर चालवतील शेतकरी संस्था…

Share

आकोट- संजय आठवले

संपूर्ण देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले असतानाच सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे काबीज करून आकोट बाजार समितीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे. बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहुल्य असलेल्या सहकार गटाने एक हाती सत्ता प्राप्त करून बाजी मारली होती. आता समितीची सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे आपल्याकडे खेचून काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे सभापती व उपसभापती यांनी अभियांत्रिकी शाखेतून पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्याने आता इंजिनीयर झालेली जोडी शेतकरी संस्थेचा कारभार चालविणार असल्याचे चित्र आहे.

आकोट बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार गटाने अतिशय डोके लढवून उमेदवारांची निवड केली. त्याकरिता या गटाने उच्च शिक्षण, जातीय व विभागीय समतोल, सामान्य तथा वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांची आवड, निवड यांचा तौलनीक अभ्यास केला. त्यानंतर पारखलेल्या उमेदवारांसह आपल्या दिवंगत सहकाऱ्यांचे वारसदार यांची सांगड घालून आपले उमेदवार घोषित केले. त्यावर काही जुन्या रुढीवादी नेत्यांनी नापसंती प्रकट केली. परंतु राजकारणाचा बदलता रोख व नव्या पिढीला पुढे येण्याचा मोका या दृष्टीने सहकार गटाने आपले उमेदवार बाजार समिती निवडणुकीत उतरविले. त्यातच विरोधी पॅनलच्या आपसातील फुटीचाही सहकार गटाला मोठा फायदा झाला. आणि त्यांनी हां हां म्हणता बाजार समिती काबीज केली.

बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीबाबत सहकार गट पूर्वापार एक धोरण आखित आलेले आहे. त्यानुसार मराठा समाजाचा सभापती तर कुणबी समूहाचा उपसभापती. त्यासोबतच आकोट तालुक्याच्या उत्तर भागातून सभापती तर दक्षिण भागातून उपसभापती करण्याची परंपरा आहे. आताही त्याच धोरणाचा अवलंब करण्यात आला. सभापती पदाकरिता आधीच प्रशांत पाचडे व धीरज हिंगणकर ही दोन नावे निर्विवाद समोर केली गेली. परंतु एका दगडात अनेक पक्षी मारण्याची सवय असल्याने पहिल्या अडीच वर्षांकरिता प्रशांत पाचडे यांचे नावाला पसंती देण्यात आली. अभियांत्रिकी शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले प्रशांत पाचडे हे पक्षीय राजकारणात चांगले वर्चस्व ठेवून आहेत. अनेक वर्षे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आकोट तालुका अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. त्यामुळे या पक्षाच्या माध्यमातून त्यांचा शहरी भागासह ग्रामीण भागातही दांडगा जनसंपर्क आहे. अतिशय मितभाषी, मृदुभाषी आणि सर्वांना घेऊन चालणारे म्हणून त्यांचा लौकिक आहे. आपल्या लाघवी स्वभावाने कुणालाही प्रभावित करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांना बाजार समिती सभापती केल्याने भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून उमेदवारी मिळण्याकरिता मोठा आधार मिळू शकतो. त्याकरिता सहकार नेत्यांनी मोठ्या हुशारीने प्रशांत पाचडे यांचे सभापती पदावर शिक्कामोर्तब केले. तर पुढील अडीच वर्षे धीरज हिंगणकर यांना देण्याचे ठरले.

प्रथम अडीच वर्षाच्या उपसभापती पदाकरिता श्रीकांत उर्फ गोपाल सपकाळ व अतुल खोटरे या दोघांचे नावाची ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये अतुल खोटरे यांनी बाजी मारली. अतुल खोटारे हे आकोट तालुक्याच्या दक्षिणेकडील भागातील लोकप्रिय सहकार नेते दिवंगत दादा खोटरे यांचे चिरंजीव आहेत. दांडगा लोकसंपर्क आणि लोकांची कामे करण्याचा वारसा त्यांनी त्यांचे वडिलांकडूनच घेतलेला आहे. अभियांत्रिकी शाखेतून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले अतूल खोटरे हे सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत. या पक्षाच्या विद्यमान कार्यकारणीमध्ये जिल्हा सरचिटणीस पदावर ते कार्यरत आहेत. त्या निमित्ताने ग्रामीण भागात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. त्यांचे राहते गाव अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून उमेदवारी मिळणेकरिता त्यांना या पदाचा मोठा लाभ होऊ शकतो. याकडेही सहकार गट नजरा रोखून आहे.

याशिवाय येत्या काळात आकोट तालुका खरेदी विक्री संघाचीही निवडणूक होणार आहे. त्याकरिता पाटील-कुणबी मतदार एकसंध ठेवून ती एक गठ्ठा मते आपल्या पदरात पाडण्याची सहकार गटाची खेळी आहे. त्याकरिता बाजार समितीचे हे पाटील-कुणबी समीकरण सहकार गटाला मोठे उपयोगी पडणार आहे. हे गणित डोळ्यासमोर ठेवून सहकार गटाने सभापतीपदी प्रशांत पाचडे यांची तर उपसभापती पदी अतुल खोटरे यांची वर्णी लावली आहे. मात्र या खेळीत खारेपाणी पट्ट्यातील सहकार गटाच्या एका मोठ्या मोहऱ्याची खपा मर्जी झाली आहे. बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहकार गटाला चोहोट्टा भागातून प्रचंड रसद पुरविण्याचे काम या मोहऱ्यानेच केले आहे. प्रसंगी आपले खिशालाही खार लावला आहे. त्या कामाचे चीज म्हणून प्रथम अडीच वर्षाचे उपसभापती पद आपणास मिळावे अशी रमेश वानखडे यांची मागणी होती. परंतु सहकार गटाचे धोरण आणि नीती आधीच ठरलेली असल्याने त्यांची ती मागणी पूर्ण झाली नाही. त्या ऐवजी त्यांना पुढील अडीच वर्षाचे उपसभापती पद देवू करण्यात आले. मात्र तो प्रस्ताव धुडकावून रमेश वानखडे यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. जाता जाता त्यांनी आपण आपल्या संचालक पदाचे त्याग पत्र देणार असल्याचे महाव्हाईसला सांगितले. सभापती, उपसभापती निवडणुकीच्या गदारोळात ही चर्चा फारशी झाली नसली तरी सहकार गटाला हा मोठा झटका बसला आहे. त्यावर वेळीच डॅमेज कंट्रोल न झाल्यास सहकार गटाला त्याची मोठी झळ बसणार हे निश्चित.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: