उमेद काव्यस्पर्धेच्या विजेत्यांचा गुणगौरव…जगभरातून स्पर्धकांचा मोठा सहभाग

महाराष्ट्रातीलच नव्हे तर विश्वातील तमाम मराठी आणि हिंदी साहित्यिक रसिक वृंद यांच्या अभिव्यक्तीसाठी फेसबूकच्या माध्यमातून ८ जून २०२० रोजी साहित्यासाठी वाहून घेतलेल्या “कविता : तुझी आणि माझी!” या दर्जेदार काव्य समूहाची निर्मिती करण्यात आली.

मराठी आणि हिंदीतील नवोदितांना हक्काचे नितांत सुंदर व्यासपीठ तयार करणे हाच प्रमुख उद्देश या समूहाचा असून त्यासाठी आजतागायत अनेक काव्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ५ जानेवारी ते २० जानेवारी २०२२ दरम्यान ‘उमेद’ या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मराठीची साहित्य आणि कवितेची अस्मिता जपण्यासाठी या स्पर्धेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर आबुधाबी, सिंगापूर आणि न्यूयॉर्क येथील मान्यवर कवी आणि कवयित्री यांनी सुद्धा उल्लेखनीय सहभाग नोंदवून मराठी कवितेवरील असलेले प्रेम जोपासले. यातूनच आपल्या “कविता : तुझी आणि माझी!” या साहित्य समुहाची जगभरात दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता लक्षात येते.

सृजनशील लेखणीतून सर्वांच्या मनातील उमेद जागी करून नव्या संकल्पांसह ध्येयाकडे वाटचाल करीत आकाशाला गवसणी घालण्यासाठी आपल्या ध्येयासक्त शब्दांतून, कवितेतून यथाशक्ती मदत आणि प्रयत्न या सर्वच सहभागी मान्यवर नवोदित साहित्यिकांनी केले.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ तुकोबा रायांच्या या काव्यातून साहित्यासारखी खासकरून कवितेसारखी नितांतसुंदर आभूषणे आणि त्यांची गर्भश्रीमंती रसिकत्व जपणाऱ्यांकडेच मिळते.

समुहामार्फत आजतागायत अनेक स्पर्धांचे आयोजन करून त्याचे परिक्षण महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक यांच्याकडून केले गेले.
सदर उमेद काव्य स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्रातील प्रथितयश कवी प्रा. संपत माणिकराव गर्जे यांनी केलेले आहे; ज्यांचा “शब्द आशयाचे घन” हा अप्रतिम काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या परीक्षणानुसारच नि:पक्षपाती भावनेने सर्व कवितांचे निकाल घोषित करण्यात आले.

कोणत्याही स्पर्धेतील यशापयश खिलाडू वृत्तीने स्वीकारता आले तरच आयुष्याच्या रणांगणातील अनेक स्पर्धा आपण लीलया जिंकू शकतो. असे वक्तव्य समूहाचे संचालक कवी ज्ञानेश सूर्यवंशी यांनी केले.
गेल्या दोन वर्षांपासून “कविता : तुझी आणि माझी!” या समूहात सक्रिय असलेले नवोदित, अभ्यासू आणि प्रतिभासंपन्न कविवर्य रिंकी गौतम उर्फ गौतम वेंगुर्लेकर यांच्या कवितेला विशेष उल्लेखनीय कविता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर उमेद काव्य स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी आणि समूहाचे संचालक संतोष जगताप आणि “कविता : तुझी आणि माझी!” प्रशासन मंडळातील सर्वच मान्यवर पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.

उमेद काव्य स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे

प्रथम क्रमांक: कविवर्य विकास गजापुरे, नागपूर
द्वितीय क्रमांक: कवयित्री स्मिता धर्माधिकारी, पुणे
तृतीय क्रमांक: कविवर्य गौतम वेंगुर्लेकर, सावंतवाडी

उत्तेजनार्थ 1. कवयित्री मनीषा कुलकर्णी आष्टीकर, परभणी

  1. कवयित्री मुक्ता कुलकर्णी, जयसिंगपूर
  2. कविवर्य भानुदास धोत्रे, परभणी
  3. कविवर्य दीपक अमोलीक, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here