पुराने बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई द्या;भाजयुमो तालुकाध्यक्ष ब्राम्हणकर यांची मागणी…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

आठवडाभरापूर्वी लाखांदूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चुलबंद नदीला पूर येऊन नदीकाठावरील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली आहे. तर दुसरीकडे गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या बॅक वॉटर मुळे देखील धान शेतीचे नुकसान झाले आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेता शासनाने पुराने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लाखांदूर तालुका भाजयुमो अध्यक्ष योगेंद्र ब्राह्मणकर यांनी केली आहे. गत आठवड्याभरापूर्वी लाखांदूर तालुक्यातील चारही मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.

शासन दरबारी तालुक्यात 80.5 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे तालुक्यातील चुलबंद नदीला पूर येऊन विशेषतः बारावा व लाखांदूर मंडळातील नदीकाठावरील धान शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे गोसे धरणाच्या डाव्या कालव्याचे बॅक वॉटर शेतात पसरल्याने विरली व मासळ मंडळातील धान शेतीचे नुकसान झाले आहे. सदर दोन्ही प्रकरणी शासनासह महसूल विभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधित क्षेत्राची पाहणी चौकशी व पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here