कोविड – १९ मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या; सर्वांगीण उन्नतीसाठी टास्क फोर्सने झटून काम करावे – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी…

सांगली – ज्योती मोरे

कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी टास्क फोर्सने झटून काम करावे. तसेच शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन केलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विश्वास माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण कार्यक्रम अधिकारी संदीप यादव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचेता मलवाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांच्यासह टास्क फोर्स समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना शालेय प्रवेश फी भरण्याबाबत अडचणी निर्माण होवू नयेत याकरिता सर्व बालकांची शैक्षणिक माहिती एकत्रित करून या बालकांना शालेय फी बाबत यथायोग्य मदत मिळवून द्यावी. बालकांचे अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना समाज कल्याण विभाग,

महिला आर्थिक विकास महामंडळ व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत पात्रतेनुसार शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावेत, असे सांगून टास्क फोर्स समितीचा विषयनिहाय सखोल आढावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी घेतला.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी टास्क फोर्सच्या आत्तापर्यंतच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 18 असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 666 आहे.

यापैकी 651 बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण करण्यात आलेले आहेत. 572 बालकांना बाल संगोपन योजनेचे आदेश देण्यात आले आहेत. 12 अनाथ बालकांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here