बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह… मुलीने शिक्षण पूर्ण करू देण्याची केली विनंती…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा खुर्द येथे सोळा वर्षाच्या व 10 वी मध्ये शिकत असलेल्या मुलीचे वडिलाचे छत्र हरवल्यामुळे लग्न करून लवकर जबाबदारी मधून मुक्त व्हावे, म्हणून बाल विवाहाचा घाट घातला होता.

मात्र जबाबदार व्यक्तीने सदर मुलीचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचवले व जिल्हा बाल संरक्षण कक्षास माहिती दिली. त्यानंतर तत्परतेने बाल संरक्षण कक्षाची चमू गावात धडकली. बालिकेच्या कुटुंबाला सदर बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.

पालकांना मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनिमय 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली.

शेवटी मुलीच्या कुटुंबियाकडून बाल विवाह न करणे बाबत लेखी बंधपत्र उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष लिहून देण्यात आले. यावेळी बालिकेने शिक्षण पूर्ण करू द्या मला दहावीची परीक्षा द्यायची आहे, पुढे शिक्षण घेऊ द्या अशी विनवणी उपस्थितांना केली.

सदर बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, आकाश बुर्रेवार, नायब तहसिलदार डी.एम. राठोड, संरक्षण अधिकारी एस.बी.राठोड, ग्रामसेविका मिना मिसाळ, तलाठी एस.पी.राऊत, अंगणवाडी सेविका मिना देठे यांनी कार्यवाही पार पाडली.

बाल विवाहबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, तसेच बाल विवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ अथवा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here