अमरावती – शासनातर्फे ‘कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२० ‘राबविण्यात येत असून या धोरणाअंतर्गत १ एप्रिल २०१८ पासून पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना पारंपरिक पध्दतीने व सौर ऊर्जेव्दारे वीज जोडणी देण्याचे प्रस्तावित केले आहे.
तसेच मार्च २०२४ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या धोरणात थकबाकीदार शेतकऱ्यांना ६७ टक्यांपर्यंत सवलत देऊन थकबाकीमुक्त होण्याची संधीही उपलब्ध आहे. हे धोरण यशस्वी होऊन अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व विविध मान्यवरांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा नियोजन बैठकीत केले.
अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी बैठकीच्या प्रारंभी धोरणाबाबत सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीकडे नेणाऱ्या या धोरणाचा कालावधी तीन वर्षाचा असून पहिल्या वर्षी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे विलंब आकार व व्याज संपूर्ण माफ केल्यानंतर त्यांना सुधारीत मुळ थकबाकीच्या केवळ ५० टक्केच थकित वीजबिल भरायचे आहे.
दुसऱ्या वर्षी हा लाभ २० टक्याने तर तीसऱ्या वर्षी ३० टक्क्याने कमी होणार आहे. एवढेच नाही तर या धोरणानुसार एकून वसूल वीज बिलाच्या ३३% नीधी हा जिल्ह्याच्या वीज यंत्रणा सक्षमीकरणाच्या कामासाठी आणि ३३% च नीधी संबंधीत ग्रामपंचायतीच्या वीज यंत्रणा सक्षमीकरणाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.
याव्यतीरिक्त वीजबिल वसूलीकरिता वसूल बिलाच्या ३० % थकबाकी वसूलीवर आणि २०% चालू बिलाच्या वसूलीवर पोत्साहन नीधीचीही तरतूद ग्रामपंचायतीकरीता करण्यात आलेली आहे. याव्यतीरिक्त गावपातळीवरील सहकारी संस्था,महिला बचत गट,महिला स्वंय सहाय्यता गटालाही वीज देयक संकलन एजन्सी म्हणून नेमणूक आणि त्यांना वरिल प्रोत्साहन देऊन सशक्त बनविण्याची तरतूद केलेली आहे.
वीज जोडणी धोरणानुसार ज्या नविन कृषीपंपाचे अंतर लघूदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आत आहे,रोहित्रावर पर्याप्त क्षमता आहे अशा सर्व ग्राहकांना एका महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येणार आहे.
तसेच लघूदाब वाहिनीपासून २०० मीटरच्या आत व रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक असलेल्या नविन कृषीपंप ग्राहकांना एरीयल बंच केबलव्दारे काही अटीवर तीन महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येणार आहे. २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या नविन ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे व ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना अपारंपरिक पध्दतीने सौरकृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याचे धोरण असल्याचेही यावेळी गुजर यांनी सांगितले.