तारापूर औद्योगिक वसाहतीत केमिकोन कारखान्यात रासायनाची टाकी फुटली…

रसायन आणि विषारी वायूच्या उग्र वासाने परिसरात भीतीचे वातावरण….विषारी वायुमुळे 1 महिला गंभीर तर 6 कामगारांना किरकोळ बाधा.

पालघर,ता.07(नविद शेख)
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहती मधील केमिकोन केमिकल्स या कारखान्यात “फॉर्मलडिहाइड” या रसायनाचा साठा असलेली वीस टन क्षमतेची टाकी सकाळी सात वाजताच्या सुमारास आचानक फुटली होती. त्यामुळे टाकीतील रसायन वातावरणाच्या संपर्कात आल्याने विषारी वायुची निर्मिती झाली होती.

विषारी वायूची बाधा झाल्याने एक कामगार महिला गंभीर झाली होती तर सहा कामगारांना किरकोळ बाधा झाली होती. कारखान्यालगतच्या 50 हून अधिक कारखान्यांमधील कामगार आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विषारी वायूची बाधा होऊन डोळे जळजळने, डोके दुखी आणि घशात खवखवण्या सारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

विषारी वायुमुळे कारखान्यालगतच्या प्लॉट क्र.डब्ल्यू 24 या कारखान्यातील दामिनी भगवान सिंग, (वय.21) नामक कामगार महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला उपचारासाठी तुंगा हॉस्पीटल दाखल करण्यात आले होते.बाधा झालेल्या इतर सहा कामगारांना प्रथमोपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे.

केमिकोन कारखान्यात टेक्सटाईल एझल्रिजचे उत्पादन घेतले जाते.कारखाना प्रमोद मेहता यांच्या मालकीचा असून,गेल्या वर्षी याच मालकाच्या हिमसन केमिकल प्लाट नंबर एन 75 या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला होता.

केमिकोन कारखान्यात 10 ते 12 कामगार काम करीत असून दिवस पाळीत कारखान्यात उत्पादन सुरू असते. सकाळी सात वाजता टाकी फुटल्याचे कारण समजू शकले नाही.अग्निशमन दलाच्या चार बंबावरील जवानांच्या सहा तासाच्या अथक प्रयत्नांनी रसायनाचा प्रादुर्भाव कमी केला.दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन लगतच्या सुमारे 50 कारखाने ठेवण्यात आले होते.

याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग ही याप्रकरणी चौकशी करित आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगार व नागारिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here