नामदास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा…स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

भंडारा : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी महापुराची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे भंडारा जिल्हा महापुराच्या विळख्यात अडकला. यात घरदार, शेतीसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. महापुरामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागले. या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांच्यावर फौजदारी गुन्ह्यासह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पूरग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भंडारा जिल्हा प्रमुख राकेश चोपकर यांनी सदर निवेदन दिले आहे. भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. निवेदनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांना देण्यात आली. या निवेदनात, २९ आणि ३० ऑगस्टला भंडारा जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति एकर व प्रत्येक कुटुंबियांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. सोबतच प्रती कुटुंबांला ५० हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत तसेच ज्या कुटुंबाचे घरांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात २९ व ३० ऑगस्टला महापूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली येऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या घरांचे व जीवनोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एखादा शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून पीक पिकवण्यासाठी कष्ट घेतो सोबतच शेतीसाठी लागणारे पैसे बँकेतून, नातेवाईकांकडून, सावकारांकडून तसेच आपल्या घरातील दागिने विकून जमेल त्या माध्यमातून पैसे जुळवून शेती करतो. परंतु यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीबद्दल पूर्वसुचना दिली नाही. त्यामुळे शेतीतील पिके व बरेच कुटुंब क्षणात उध्वस्त झाले.

महापुरामुळे शेकडो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने पूरपरिस्थितीची पूर्वकल्पना दिली असती तर, हा प्रसंग ओढविला नसता. नदीकाठावरील शेतात व गाववस्त्यात पाणी शिरून उभे पीक व घरांना महापुराने वेढले. यामुळे बरेच शेतकऱ्यांचे व कुटुंबाचे नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या वेळी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ योग्यरीतीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपये व नुकसानग्रस्त कुटुंबियांना ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.

तसेच ज्यांची घरे पुरात वाहून गेली किंवा ज्यांच्या घराचे नुकसान झाले त्यांना तात्काळ घरकुल द्यावे. सदर प्रकरणात हयगय करून जनतेच्या जीवाशी खेळणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नामदास यांची चौकशी करून त्यांचेवर फौजदारी कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

या निवेदनाच्या प्रति मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेेट्टीवार, नागपूर विभागाचे आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदन राकेश चोपकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात तालुका प्रमुख प्रभाकर सार्वे, शहर प्रमुख प्रमोद केसलकर, युवा प्रमुख सुरज निंबार्ते, कामगार आघाडी प्रमुख गुड्डू मेहर, दिलीप देशमुख, अशोक खोब्रागडे, शशीकांत मस्के, राधेश्याम मेश्राम, रोशन वंजारी, पिंटू पटले यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here