पेंच व्याघ्र प्रकल्पाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….सिल्लारी अमलतास येथे बँक ऑफ इंडिया च्या ATM चे उदघाटन.

राजू कापसे, रामटेक

पेंच व्याघ्र प्रकल्पाची स्थापना दि. 22 फेब्रुवारी 1999 रोजी झाली, स्थापनेवेळी पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातला 25 वा व्याघ्र प्रकल्प होता. आज अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र सिल्लारी येथे पेंच व्याघ्रप्रकल्पाचा 23व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला . वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व श्री. बी. एस. हुडा हे अध्यक्ष म्हणून तर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तसेच मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमी चे डॉक्टर अनिल पिंपळापुरे तसेच बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक श्री विलास पराते, व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, सहाय्यक वनसंरक्षक किरण पाटील तसेच व्याघ्र प्रकल्पातील सर्व वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना श्री. अतुल देवकर यांनी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ते आजतागायत झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करून व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात योगदान दिलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच इतर बिगर शासकीय संस्थाचा गौरव केला. श्री. डॉ. रविकिरण गोवेकर यांनी मार्गदर्शन करताना येत्या वर्षात व्याघ्र प्रकल्पात हाती घेण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांची माहिती दिली व सर्व वन कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात मा. हुडा साहेब यांनी आजतागायत झालेल्या सर्व घटना डिजिटल स्वरूपात साठवण्याच्या तसेच सर्व सदस्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात योगदान देणेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमी चे अध्यक्ष, डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या पक्षी निरीक्षण मोहिमेबाबत माहिती दिली.

तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यात पहिल्यांदाच व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन गेट वरील येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र, सिल्लारी येथे बँक ऑफ इंडियाच्या एटीएम चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वनपाल, वनरक्षक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच निसर्ग मार्गदर्शक यांना दुर्बीण वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप संकपाळ यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक श्री किरण पाटील यांनी केले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

-उपसंचालक
पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here