Breaking | समीर वानखेडे जन्माने मुस्लीमच…बीएमसीचा दावा…

फोटो -सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – आर्यन खान प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने तशी कागदपत्रे कोर्टात सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं. बीएमसीच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल शंका उपस्थित केली होती. वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी वानखेडेंचे जात प्रमाणपत्रं आणि निकाहनाम्याची कॉपीही दिली होती. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं, तर उद्या याप्रकरणाची कोर्टात सुनावणी होणार आहे.

या संदर्भात महापालिकेकडूनही वानखेडेंबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली होती. वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते तर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. मात्र, या वृत्ताला पालिकेने दुजोरा दिला नसला तरी पालिकेने कोर्टात कागदपत्रं सादर केल्याने उद्या कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या इन चेंबर सुनावणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सुनावणीवेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनाही ही कागदपत्र दिली जाणार आहे. त्यामुळे वानखेडे यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here