Breaking | यवतमाळ जिल्ह्यात ११ कोरोना पॉझिटिव्ह…एक्टिव पॉझिटिव्हची संख्या ७२…तर १७ जण कोरोनामुक्त

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 24 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेले 17 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 78 वरून 61 वर आला होता. मात्र जिल्ह्यात पुन्हा नव्याने 11 जणांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने हा आकडा आता 72 झाला आहे.


बुधवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 11 जणांमध्ये पाच पुरुष आणि सहा महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील एक पुरुष, वणी येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक महिला, दारव्हा येथील एक पुरुष आणि दोन महिला तर नेर येथील दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 58 जण भरती आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली असून यापैकी सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 72 आहे. तसेच उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या 178 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत 4186 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 4011 रिपोर्ट प्राप्त तर 175 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3753 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


जिल्हाधिका-यांची पुसद येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुसद तालुक्यातील मौजा धुंडी तसेच शहरातील मालीपुरा आणि वसंतनगर या तीन प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. धुंडी गावात 555 कुटुंब असून येथील लोकसंख्या 2700 आहे. येथे आरोग्य विभागाच्या आठ टिम कार्यरत आहे. पुसद शहरातील मालीपुरा भागात 123 कुटुंब व 648 लोकसंख्या असून येथे आरोग्य विभागाच्या चार टिम तर वसंतनगर येथे 173 कुटुंब असून 824 लोकसंख्येसाठी चार टीम कार्यरत आहे.


यावेळी आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागातून आणखी नमुने तपासणीकरीता पाठवावे. सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर तपासणी करावी. जे नागरिक पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त आहेत, अशा नागरिकांची रोज पल्स ऑक्सीमीटरने आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. यात कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका.

तालुक्यातील सर्व ग्रामस्तरीय समित्यांनी अत्यंत गांभीर्याने कामे करून सारीची तसेच आयएलआयची लक्षणे असलेल्या नागरिकांबाबत त्वरीत आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. सारी आणि आयएलआयची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.


कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या आरोग्यासाठी संपूर्ण यंत्रणा झटत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. या संकटाच्या काळात सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.


यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, न.प.मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कोव्हीड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here