Breaking | राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा..

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा….सोबतच 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.

मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू यांना महागात पडले असून याबाबत भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली होती….

मिळालेल्या माहितीनुसार चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली होती की, आमदार कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत हा फ्लॅट विकत घेतला. 19 एप्रिल 2011 रोजी त्या फ्लॅटचा ताबा आमदार कडू यांनी घेतला आहे. त्यानंतर त्यांनी अचलपूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर केला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते.

निवडणुकीचा अर्ज सादर करताना उमेदवारांना स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या मालकीच्या मालमत्तेचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाकडे एका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा लागतो. परंतु, आमदार कडू यांनी मुंबई येथील मालमत्तेसंदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here