Breaking | शिवनीबांध जलाशयात बुडून दोघांचा मृत्यू…पोहता न आल्याने घडली घटना…मृतक गोंदिया जिल्ह्यातील सौंदडचे रहिवाशी

भंडारा : मुसळधार पावसामुळे साकोली तालुक्यातील शिवनीबांध जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावावर मित्रांसोबत मौजमस्ती करण्याकरिता आलेल्या मात्र, तलावाच्या पाळीवर बसले असताना तोल जावून खोल पाण्यात पडल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज गुरुवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

नितेश धनिराम सूर्यवंशी (२०), अमर शामराव कुंभरे (२०) दोघेही रा. श्रीनगर (सौंदड) ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया अशी मृतकांची नावे आहेत. हे दोघेही औद्योगीय प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) चे विद्यार्थी होते. दोन्ही मृतक हे अन्य चार मित्रांसह शिवनीबांध तलावावर आले होते. मृतक दोघांनाही पोहता येत नव्हते.

त्यामुळे दोघेही तलावाच्या पाळीवर बसले होते, तर अन्य चार मित्रांना पोहता येत असल्याने ते तलावाच्या पाण्यात उतरून मनमुराद आनंद घेत असल्याची चर्चा सुरू आहे. तलावाच्या पाळीवरील दगडावर बसलेले असताना दोघांचाही अचानक संतुलन बिघडले आणि ते तलावाच्या पाण्यात पडले. ज्या ठिकाणी दोघेही पडले तिथे खोल पाणी होते.

मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचविण्यासाठी उपस्थितांनी बराच प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मागील २५ वर्षात कधी नव्हे तो, यावर्षी साकोली तालुक्यातील शिवनीबांध हा तलाव मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला. शिवनीबांध हा तलाव मासोळी व्यवसायासाठी आणि जलतरणासाठी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

तलावाचा ओव्हरफ्लो वाहत असल्याने येथे मौजमस्ती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची दिवसागणिक संख्या वाढली आहे.घटनेची माहिती मिळताच सकोलीचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम हे पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here