पालघर – बोईसर शहराच्या चित्रालय भागातील मंगलम ज्वेलर्स नामक सोने चांदी विक्रीच्या दुकानावर दरोडा पडला आहे. मंगळवारी रात्री ज्वेलर्सच्या दुकानाला लागून असलेल्या दुकानाची भिंत फोडून दुकानात प्रवेश करीत चोरट्यांनी सुमारे 14 किलो-सोने चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
बुधवारी सकाळी दुकान उघडल्यावर दुकान मालक श्रीरंग पाटील यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले.घटनास्थळी बोईसर पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.सीसीटीव्ही फुटेज नुसार मंगळवारी रात्री मंगलम ज्वेलर्स शेजारच्या दुकानाची भिंत तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
14 किलो सोने आणि ग्राहकांचे 60 लाख रुपये किंमतीचे दागिने मिळून 7 कोटी 60 लाख किंमतीच्या सोन्याच्या चोरीचा अंदाज व्यक्त केला आहे. मुख्य बाजारपेठेत चोरी झाल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे कैद झाले आहेत.
चोरीत सहा ते सात जणांचा सहभाग दिसून येत आहे.दुकान मालक श्रीरंग पाटील यांनी मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले.बुधवारी सकाळी दुकान उघडताच दुकान फोडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून बोईसर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे