Breaking | उद्यापासून राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू…मुख्यमंत्री

न्यूज डेस्क – राज्यात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे राज्यात उद्यापासून १५ दिवस लॉकडाऊन लागू केला असून याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील.

पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.

पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे.

बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.

गेल्या वर्षीही आपण पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा म्हणालो होतो की पुढचा गुढी पाडवा कोविडमुक्त असू दे. मधल्या काळात तशी परिस्थिती आपण नक्कीच निर्माण केली होती. फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवर नियंत्रण मिळवलं होतं. जिंकत आलेल्या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. भयानक पद्धतीने रुग्णवाढ झाली आहे. आजचा आकडा आजपर्यंतचा सर्वात जास्त आहे. ६० हजार २१२ रुग्ण राज्यात सापडले आहेत. ही भितीदायक परिस्थिती आहे.

प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here