आकोट – संजय आठवले
राज्यशासनाकडे सातत्याने मांडलेल्या परंतु अद्यापही प्रलंबीत असलेल्या मागण्यांची त्वरित पुर्तता न केल्यास नजिक भविष्यात होणा-या दहावी बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा शिक्षक समन्वय संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रा. सदानंद बानेरकर यानी दिला आहे.
राज्यशासनाकडे गत १०,१२ वर्षांपासुन शिक्षक समन्वय संघाद्वारे विविध मागण्या करण्यात येत आहेत. ज्यामध्ये विना तथा अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पावाढीसह शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ आणि ४ जून २०१४ मधिल वेतन आनुदान वितरणाचे सुत्र लागु करणे, त्रुटीपात्र शाळांना अनुदानासह पात्र घोषित करणे, अघोषित शाळा व नैसर्गिक तुकड्याना अनुदानास पात्र करणे, या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यासह आणखीही मागण्या शासनदरबारी आद्यापही प्रलंबित आहेत. या मागण्यांची पुर्तता न झाल्यास नजिक भविष्यात होणा-या दहावी बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचे शस्त्र ऊपसण्याचा निर्धार राज्य शिक्षक समन्वय संघाने केला आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करुनही सरकार त्याची दखल घेत नसल्याने दहावी बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात शिक्षक संघाने ९ फेब्रुवारी रोजी राज्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याना दिले आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्यातील सर्व विभागिय परिक्षा मंडळानाही दिल्या आहेत. त्यानुसार प्रलंबित मागण्यांचा त्वरित निपटारा न झाल्यास राज्यातील सर्वच शाळा महाविद्यालयांमधून घेतल्या जाणा-या दहावी व बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याचे शिक्षक समन्वय समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सदानंद बानेरकर यानी कळविले आहे.