पेंच व्याघ्र प्रकल्पात पक्षी सप्ताह साजरा…अमलतास येथे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली वन ग्रंथालयाचे उदघाटन…

राजू कापसे, रामटेक

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्म दिवसापासून (5 नोव्हेंबर) ते ज्येष्ठ पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिवसा पर्यंत (12 नोव्हेंबर) पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सात वनपरिक्षेत्र मध्ये व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक श्री. अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षांबद्दल जनजागृती करणे, पर्यावरणातील त्यांचे स्थान त्यांची भूमिका याबद्दल वन कर्मचारी तसेच स्थानिक लोक यांना माहिती पुरवणे, पक्षी निरीक्षण कार्यक्रम राबविणे, जंगला शेजारील गावांमध्ये वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे आणि गावांमध्ये पक्षांबद्दल जनजागृती करणे अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश होता.

जेष्ठ वन्यजीव तज्ञ तथा पक्षी निरीक्षक श्री. गोपाळ ठोसर आणि पक्षी तज्ञ डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध सप्ताहात पक्षी निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अंदाजे 100 च्या आसपास पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली ज्यात जवळपास 20 स्थलांतरित प्रजातींचा समावेश आहे. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी, अमलतास येथे पार पडला.

या समारोप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई श्रीमती. भारती डांगरे या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त विभागीय वन अधिकारी श्री. गिरीश वशिष्ठ उपस्थित होते. याप्रसंगी सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमी चे नितीन मराठे, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक श्री अतुल देवकर तसेच विविध वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षक यांची विशेष उपस्थिती होती. पक्षी सप्ताह चे औचित्य साधून अमलतास येथे अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानार्थ वन ग्रंथालय साकारण्यात आले आहे. या वन ग्रंथालयाचे उद्घाटन प्रमुख अतिथी श्रीमती डांगरे यांच्या हस्ते करण्यात आले,

याप्रसंगी बोलताना श्रीमती डांगरे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला तसेच सदर ग्रंथालयांमध्ये वनावर आणि वन्यजीवावर आधारित विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश करण्यात यावा असे सूचित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना श्री. अतुल देवकर यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पक्षी सप्ताहाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रम याबद्दल माहिती दिली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना श्रीमती डांगरे यांनी वनविभागामध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी कर्मचारी यांची विशेष प्रशंसा केली तसेच या क्षेत्रात महिलांचे वाढणारे योगदान याबद्दल समाधान व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. गिरीश वशिष्ठ यांनी उपस्थित वन कर्मचारी याना आपले छंद जोपासण्याचा सल्ला दिला तसेच वन संरक्षण- संवर्धन करताना वन अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या आवडी निवडी जोपासून निरीक्षण क्षमता वृद्धिंगत करावी असे सुचविले. वन ग्रंथालयाचा वापर पर्यटकांबरोबर वन कर्मचारी यांनी जास्तीत जास्त करून आपले ज्ञान वाढवावे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी केले तर आभार प्रदर्शन वन परिक्षेत्र अधिकारी कु. अंकिता तेलंग यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here