पातुर, आलेगाव वनपरिक्षेत्रातील कोट्यवधींची वनसंपदा सागवान तस्करांच्या तिजोरीत; चक्क मशीनने होते झाडांची कत्तल…

वन अधिकारी ढाब्यांवर ओल्या पार्टीत मग्न वन अधिकारी कर्मचाऱ्यांचे सागवान तस्करांची साटेलोटे?

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील आलेगाव व पातुर वनपरिक्षेत्र असलेल्या क्षेत्रांमध्ये खुलेआमपणे झाडांची कत्तल होत आहे. या कत्तलीमुळे वने ओस पडायला लागली असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले कर्मचारी, अधिकारी मात्र ढाब्यांवरील ओल्या पार्ट्यांमध्ये मग्न असल्याचे दिसते.

पातूर मधील सात माथा , शेकापूर व आलेगाव वनपरिक्षेत्र मध्ये शेकपूर, पांढुर्णा मध्ये मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडे आहेत. या सागवानच्या झाडांसह इतर सर्व प्रकारच्या वृक्षवल्लीचे संरक्षण करण्यासाठी मोठा अधिकारी व कर्मचारी वर्ग नेमण्यात आला असून त्यांना शासनाकडून मोठ्या रकमांचे पगार दिले जातात.

परंतु हे अधिकारी व कर्मचारी गलेलठ्ठ पगार घेऊन सुद्धा वन संरक्षणाची जबाबदारी सोडून मनमानीपणे ड्युटी करीत आहेत. काही बहाद्दर आठवड्यातून एकदा तर काही आठवड्यातून दोनदा ड्युटीवर दिसतात. ड्युटीवर असतानाही वनपरीक्षेत्राचे संरक्षण करण्याएवजी ढाब्यांवर पार्ट्या सोडतांना दिसतात. त्याचाच फायदा घेऊन सागवान तस्कर व चोर जंगलातील सागवान ची झाडे लंपास करीत आहेत.

या सागवान चोरांना चोरही म्हणता येत नाही. कारण चोर हा चोरून एखादी गोष्ट नेतो. पण या वनपरिक्षेत्रात सागाची झाडे अगदी बिनदिक्कत व राजरोसपणे कुऱ्हाडी किंवा करवतीने नव्हे तर जंगलात चक्क कटर मशीन नेऊन झाडे कापली जातात. एवढे सर्व होत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तिकडे फिरकत नाहीत. यावरून जंगलांचा सफाया करणाऱ्या सागवान माफियांशी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व खुलेआम प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत साॅ मील वाढलेल्या आहेत. सागवान सारखे अत्यंत टिकाऊ व चांगल्या दर्जाचे लाकूड शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून अगदी सहजपणे उपलब्ध होत असल्याने या लाकडांवर अनधिकृत साॅ मील मध्ये प्रक्रिया करून त्याचे फर्निचर बनविण्याचे धंदे सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

अनधिकृत साॅ मिल आणि फर्निचर तयार करणाऱ्यांची चौकशी केल्यास त्यांच्याकडील सागवान किती अधिकृत आणि किती अनधिकृत याची माहिती मिळू शकते. पण त्याची चौकशी करण्याची गरज सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांना कधी वाटली नाही.

आता वनविभागाच्या वरिष्ठांनी या सर्व प्रकाराची दखल घेऊन एकदा पातूर व आलेगाव वनपरिक्षेत्रात जाऊन शहानिशा करावी. दिवसाढवळ्या कटर मशीन घेऊन जंगलात कटिंग सुरू असल्याचे निश्चितच दिसेल. अशी नागरिकांची मागणी आहे.

वरिष्ठांनी सुद्धा दखल घेतली नाही तर किंवा वन अधिकारी कर्मचाऱ्यांचे सागवान तस्करांसोबत असलेले साटेलोटे पकडून कारवाई केली नाही तर आता हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकच पुढाकार घेतील. असे काही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here