मोठी बातमी | ZP आणि पंचायत समिती पोट निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका…जाणून घ्या

न्यूज डेस्क – राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याला पुन्हा हिरवी झेंडी दिल्यानंतर पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. मात्र, या निवडणुका पुढे ढकलण्यास आता निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्देशानुसारच या निवडणुका होत असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. तसंच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रमात बदल होऊ शकतो, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाच जिल्हा परिषदेत आणि पंचायत समिती मधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. भाजप नेते आणि ओबीसी संघटनेच्या दबावानंतर राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.

जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here