मोठी बातमी | बनावट TRP रॅकेटचा पर्दाफाश…अर्णब गोस्वामीच्या वृत्तवाहिनीचा समावेश…पोलीस आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती

न्यूज डेस्क – टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपीसंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले की मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला आहे. यात तीन टीव्ही चॅनल्स आहेत. अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचेही यात नाव आले आहे.

या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु आहे असे मुंबईच पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल असे त्यांनी सांगितले.

या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती देताना परम बीर सिंह म्हणाले की, ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. “मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला” असे सिंह यांनी सांगितले.

“या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांना आज अटक करण्यात आली असे अधिकाऱ्याने सांगितले. या रॅकेटतंर्गत प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले जायचे असे पोलिसांनी सांगितले.

मात्र, मुंबई पोलिसांच्या पीसीनंतर रिपब्लिक टीव्हीनेही या विषयावर आपले अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. रिपब्लिक टीव्ही म्हणते की सुशांत प्रकरणात त्यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना प्रश्न विचारल्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीवर खोटे आरोप केले जात आहेत. रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here