भंडारा जिल्ह्यात १९९४ नंतरचा मोठा महापूर…अनेक घरांमध्ये पाणीच पाणी…पाहा Video

प्रशांत देसाई
महाव्हॉईस
भंडारा

भंडारा – मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पाऊसमुळे संजय सरोवरासह अन्य धरण ओव्हरफ्लो झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. १९९४ मध्ये भंडारा जिल्हावासीयांनी पूर बघितला होता, त्यापेक्षाही हा मोठा महापूर असल्याचे बोलले जात आहे.

मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे आणि बावनथडी प्रकल्पातुन पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नदीचे बॅकवॉटर भंडारा शहरात शिरले. भंडारा शहरासह संपूर्ण जिल्हा पुराच्या पाण्याने वेढला गेल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो हेक्टरमधील शेतपिके बुडाली आहे. अनेक घरांसह शासकीय कार्यालय, भंडारा येथील बसस्थानक, बीटीबी भाजी बाजार पूर्णपणे पाण्याखाली आहे. भंडाऱ्याचा नागपूर आणि लाखनी साकोलीशी संपर्क तुटला आहे.

ग्रामसेवक वसाहत, शहराला पाणी पुरवठा होणारे जलशुद्धीकरण यंत्र, भोजपूर, गणेशपूर, विद्यानगरचा परिसर, जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील अनेक सखल भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे गृहपोयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून अनेक ठिकाणच्या घरांची पडझड झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ वर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे वाहतून थांबली आहे. वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने या मार्गावरील जड वाहतूक थांबविण्यात आल्याने रस्त्यावर दुतर्फा रात्रीपासून वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. भंडारा, पवनी व लाखांदूर, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली तालुक्यातील अनेक गावे पाण्याने वेढले असल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. तर विद्युत पुरवठा बंद असल्याने अनेक गावे रात्री अंधारात होती.

मुसळधार पाऊस कोसळल्याने वैनगंगा नदीला १९९४ नंतर असलेला हा सर्वात मोठा पूर असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे सर्वच ३३ दरवाजे ४ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा फटका गडचिरोली जिल्ह्याला बसून तेथील अनेक गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. भंडारा शहरात पुरपरिस्थि निर्माण झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाने रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी हलविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here