कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या इमारतीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन…

कुपवाड शहरासाठी आणखी एका सुसज्ज हॉस्पीटलचे नियोजन…

सांगली – ज्योती मोरे.

सुसज्ज रूग्णालयांची गरज कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर अधोरेखीत झाली आहे. कुपवाड वारणाली येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने कुपवाडकरांची अनेक वर्षांची सुसज्ज हॉस्पीटलची प्रतिक्षा पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी या हॉस्पीटलशिवाय कुपवाडला आणखी एक सुसज्ज हॉस्पीटल बामणोली रोड येथे उभारण्यात येणार असून त्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

सांगलही-‍मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने कुपवाड वारणाली सर्व्हे नंबर 191/अ 1+2 या जागेवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थे सेंटर उभारण्यात येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, महानगरपालिका आयुक्त नितीण कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, ‍विरोधी पक्षनेता संजय मेंढे, गटनेता मैनुद्दीन बागवान, माजी आमदार शरद पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, संजय बजाज, संजय विभूते यांच्यासह महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.‍

महानगरपालिका आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी उत्तम प्रकारे काम करीत असून महानगरपालिकेच्या मध्यावधी आरोग्य केंद्रातून माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात महत्व्कपूर्ण बदल घडणार आहेत, अशा शब्दात महानगरपालिका आरोग्य सुविधेला देत असलेल्या प्राधान्याबद्दल पालकमंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले. कुपवाड येथे 5 कोटी रूपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच या हॉस्पीटलसाठी महानगरपालिकेचा ठराव विखंडीत करून हॉस्पीटलला मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून अमृत पाणीपुरवठा योजना जवळपास पूर्ण होत आहे. मिरज ड्रेनेज योजना 93 टक्के तर सांगली ड्रेनेज योजना 75 टक्के पूर्ण झाली आहे. 236 कोटी रूपये खर्चाच्या कुपवाड ड्रेनेज योजनेलाही शासनस्तरावर लवकरात लवकर मान्यता घेवू. सांगलीतील काळ्या खणीचे काम सुरू असून 9 कोटी रूपयाचा वाढीव प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात येत आहे. ‍

मिरज येथील खण सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. पूर, महापूराच्या काळात पाणीपुरवठा योजना बंद पडू नयेत यासाठीची योजना हाती घेण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली, मिरज प्रमाणेच कुपवाड शहरात बगीचा विकास कार्यक्रमांतर्गत तीन ठिकाणी बगीचे उभारण्यात येणार आहेत. तसेच स्टेशन चौक, मिरजेतील गांधी चौक ही दोन्ही ठिकाणे अतिशय चांगल्या पध्दतीनी सुशोभित करण्यात येतील. या सर्व कामांसाठी शासनस्तरावरून निधी आणण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून कुपवाड शहरातील नागरिकांची मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची मागणी होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या मान्यतेमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महानगरपालिकेच्या निधी व्यतिरीक्त या हॉस्पीटलच्या सुसज्जतेसाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत पालकमंत्री व आपण स्वत: शासनाकडून मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खाजगी रूग्णालयांमधील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या रूग्णालयात सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा ‍मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी 5 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची इमारत वर्षभरात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. कुपवाडकरांसाठी हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून या हॉस्पीटलमुळे या क्षेत्राचा भौगोलिक विकास होणार असल्याचे सांगितले. या हॉस्पीटलला मंजूरी ‍दिल्याबद्दल नगरविकास विभाग आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी कुपवाड ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासंबंधी पालकमंत्री जयंत पाटील यांना विनंती केली.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने महानगरपालिकेचे पहिले अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर उभा राहात असल्याचे सांगून कोरोनाच्या लाटेत आरोग्य सेवा ‍किती सक्षम हव्यात याची प्राकर्षाने जाणीव झाली. कोरोना काळात महानगरपालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हेल्थ सेंटरची गरज अधोरेखीत झाली त्यादृष्टीने सदरचे कम्युनिटी हेल्थ सेंटर महत्त्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी नगरसेवक विष्णू माने, जयश्री पाटील, संजय विभूते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here