तेल्हारा – महाड मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रबुद्ध टीव्ही या यूट्यूब चैनल तथा फेसबुक च्या वतीने भिमराव परघरमोल (व्याख्याता तथा अभ्यासक फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तेल्हारा) यांचे ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले.
प्रवीण जामनिक बार्शीटाकळी, कुणाल हेरोडे तथा आणखी काही तरुणांनी एकत्र येऊन समाज जागृतीसाठी सुरू केलेल्या युट्युब चॅनेल तथा फेसबूक पेजच्या माध्यमातून दि. २० मार्च २०२१ रोजी, सायं. चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक १९ व २० मार्च १९२७ रोजी घेतलेली परिषद व महाड तळे सत्याग्रह याचे निमित्त साधून ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते.
भिमराव परघरमोल यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये अनेक विषयांवर प्रकाश टाकत सांगितले की महाड मुक्तीसंग्राम हा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी नसून समतेच्या संगराचे ते प्रथम पाऊल होते. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय गुलामी विरुद्ध बंडाचा झेंडा उभारायचा होता.
तसेच उच्च जातीय लोक अस्पृश्यांना माणसाचा दर्शन दर्जा देतात किंवा नाही, त्यांना नैसर्गिक हक्क अधिकार देण्याची त्यांची मानसिकता आहे किंवा नाही हेही तपासायचे होते. तसेच कोकणातील महाड हे स्थळ निवडण्याचे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक कारणं त्यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये विशद केली.एक तासाचे त्यांचे व्याख्यान हजारो लोकांनी ऑनलाइन श्रवण करून समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले.