भंडारा | पोहायला गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू…केसलवाडा येथील घटना…

भंडारा : पोहताना दम लागल्याने खोल पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील गावतलावात आज गुरुवारला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

दीपक मधुकर शेंदरे (१८) रा. केसलवाडा (वाघ) असे मृतकाचे नाव आहे. मृतक दीपक हा नित्यनेमाने मावसभावासोबत गावतलावावर पोहायला जात होता. आजही तो नित्याप्रमाणे सकाळी तलावावर पोहायला गेला.

पोहत असताना तो खोल पाण्यात गेला आणि त्याला दम लागला. यातच तो गटांगड्या खावून तलावाच्या पाण्यात बुडू लागला. सहकारी मित्रांनी त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयन्त केला. मात्र, त्यांचे प्रयत्न विफल झाले. खोल पाणी असल्याने तो बघताबघता त्यात बुडाला. दरम्यान, घटनेची माहिती ग्रामस्थ तथा लाखनी पोलिसांना देण्यात आली.

लाखनी ठाण्याचे पोलिस हवालदार रामचंद्र भोयर, पोलिस नायक गौरीशंकर कढव, प्रमोद बागडे, पोलिस शिपाई विठ्ठल हेडे, चालक पोलिस हवालदार जतिन दासानी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दिपकला बाहेर काढले. त्याच्यावर केसलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने दिपकला पुढील उपचारासाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात हलविले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालविली होती. मृतक दीपक हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास पोलिस नायक प्रमोद बागडे, पोलिस शिपाई विठ्ठल हेडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here