रागाच्या भरात बेवारस सोडून दिलेल्या दुचाकीचा शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेने लागला शोध…

राग मनुष्याला अनेक गुन्हे करण्यास कारणीभूत ठरतो, परंतु आई वडिलांच्या रागा वरून घरातील दुचाकी चोरी जावी किंवा आई वडिलांना त्रास व्हावा म्हणून दुचाकी बेवारस सोडून देण्याचा अजब प्रकार वाहतूक पोलिसांचे सतर्कतेने उघडकीस आला.

झाले असे की काल दिनांक 9।7।21 रोजी रात्री 9।30 वा दरम्यान शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सचिन दवंडे हे आपली ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन च्या मागील रोडवर अंधारात एका बाजूला एक दुचाकी उभी करून ठेवलेली दिसली, त्यांना ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी दुचाकीचे निरीक्षण केले असता ,दुचाकी हँडललॉक केलेली नसल्याचे आढळून आले.

त्या मुळे त्यांचा संशय बळावला त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता सदर दुचाकी 7।7।21 चे रात्री पासून तेथे उभी असल्याची माहिती त्यांना मिळाली सदर माहिती त्यांनी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना दिली असता त्यांनी सदर दुचाकी वाहतूक ऑफिसमध्ये लावण्याच्या सूचना दिल्या, आज दिनांक 10।7।21 रोजी आणखी शोध घेतला असता सदर दुचाकी अंकिता मधुकर तायडे रा चिराग अपार्टमेंट, गीता नगर अकोला ह्यांचे मालकीची असल्याचे समजले,

त्यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून चौकशी केली असता अजब प्रकार समोर आला, ज्यांचे नावावर सदर दुचाकी होती त्या युवतीचे लग्न झाले असून सदर दुचाकी लग्नापूर्वी त्या युवतीचे आई वडिलांनी घेऊन दिलेली असल्याने त्यांचे कडेच होती, युवतीचे भावाची दुचाकी आर्थिक परिस्थितीमुळे नाईलाजाने विकल्याने भाऊ खूप नाराज झाला होता व बहिणीची दुचाकी चालवू देत नसल्याने हाच राग मनात धरून 7।7।21 ला अत्यावश्यक काम आहे असे सांगून घरून घेऊन गेला.

रात्री परत आल्यावर दुचाकी बद्दल विचारले असता बस स्टँड वर दुचाकी लावल्याचे सांगितले व उडवा उडवीची उत्तरे दिली ,वडिलांनी बसस्टँड वर शोध घेतला परंतु मिळून आली नाही म्हणून मुलानेच दुचाकी चे काही काळेबेरे केले असावे असा संशय आल्याने ते आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार होते तेवढ्यात वाहतूक शाखेकडून दुचाकी वाहतूक शाखेत जमा असल्याची बातमी मिळाली,

आज कागदपत्रांची पडताळणी करून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक अंमलदार सचिन दवंडे ह्यांचे उपस्थिती मध्ये दुचाकी त्यांचे ताब्यात देण्यात आली दुचाकी व्यवस्थित परत मिळाल्याने पूर्वी गृहरक्षक दलात कार्यरत असलेल्या श्रीमती गीता मधुकर तायडे ह्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here