बळीराजा सुखावला…दुबार पेरणीचे संकट टळले…

पातूर ( तालुका प्रतिनिधी )

काल आणि आज पावसाने हजेरी लावल्याने पातूर तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. दोन दिवसापासून पावसाच्या सरी बरसत असल्याने चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे.


पातूर तालुक्यातील जवळपास शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. दहा दिवसापूर्वी दमदार पावसाने तालुक्यात हजेरी लावली होती. यामध्ये तर आलेगाव, मळसूर भागात पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. अनेकांच्या शेतात पाणी तुंबले होते.

या पावसाच्या आगमनानंतर पातूर तालुक्यात पेरणीची लगबग सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास शंभर टक्के शेतकऱ्याची पेरणी पूर्ण झाली. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना आठवडाभर पावसाने हुलकावणी दिली.

अनेक शेतकऱ्यांनी स्पिंक्लर लावून पिके जागविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली होती. तर काही शेतकऱ्यांच्या पिकांची उगवण क्षमता पाण्याअभावी कमी झाली असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

मात्र मंगळवार ला सांयकाळी पाऊस आल्याने शेतकरी सुखावला. आणि आज दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळले असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवस बरसलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here