जांभूळ पिकाच्या भौगोलिक मानांकन मिळविण्याचा बहाडोलीचे शेतकऱ्यांचा निर्धार…

मनोर – पालघर तालुक्यातील वैतरणा नदी किनारच्या बहाडोली गावातील प्रसिद्ध जांभळाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जांभूळ उत्पादक शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी गुरुवारी (ता.01) सभा आयोजित केली होती.यावेळी उपस्थित जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना भौगोलिक मानांकनाबाबत पालघरचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नेरकर, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी मार्गदर्शन केले.

बहाडोली गावातील जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी (GI) लागणारी प्राथमिक माहिती आणि आवश्यक दस्तावेजाबाबतची माहिती तरुण वैती यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.जांभळाच्या झाडाचा इतिहास,जांभुळ फळाचे वैशिष्ट, जांभूळ लागवड असलेल्या परिसराचा नकाशा,जांभूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबतची वर्तमानपत्रातील कात्रणे,

कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या जांभूळ बागेतील भेटींची छायाचित्रे आदी माहिती शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र करणे गरजेचे आहे.तसेच भौगोलिक मानांकनाच्या प्रक्रियेदरम्यान लागणारी रक्कम शेतकऱ्यांनी गोळा करण्याचे आवाहन त्यांनी केले. भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करण्यासाठी तज्ञ लोकांची नेमणूक करून गावामध्ये जांभूळ फळपिकाच्या लागवडीत वाढ करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित जांभूळ आणि भाजीपाला विक्रीबाबत उपविभागीय अधिकारी दिलीप नेरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळणार नाही.शेतकरी स्वयंसहायता गट,महिला बचत गट यांच्या सहकार्याने जांभूळ आणि भाजीपाला विक्री करणे शक्य आहे.

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित जांभूळ पिकाचा क्लस्टर तयार केला असल्याने विविध योजनांचा समावेश यात करण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक व गटामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून यावेळी करण्यात आले.

यावेळी शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रकाश किनी,सचिव कल्पेश कुडू,मंडळ कृषी अधिकारी नरगुलवार,कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील आणि कृषी देविका नीलम लहांगे आणि जांभुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/Index

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here