न्यूज डेस्क – दारू पिऊन एखादं कृत्य करणं, किती भयानक ठरू शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. दारूच्या नशेत असताना एका व्यक्तीला सापाने चावा घेतला. त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीनेही सापाला चावून त्याचे चार तुकडे केले आहेत.
या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित व्यक्ती रुग्णालयात जावून हजर झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टरही चक्रावले आहेत. याप्रकारानंतर व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
संबंधित घटना उत्तरप्रदेशातील असून साप चावलेल्या व्यक्तीचं नाव राज कुमार आहे. तो आपल्या घरात दारू पित बसला होता. त्यावेळी अचानक घरात शिरलेल्या सापाने राज कुमारवर हल्ला केला. यावेळी राज कुमार दारुच्या नशेत होता.
त्याला सापाने चावा घेतल्याचं लक्षात येताच, संतापलेल्या राज कुमारला काय करावं हे सुचलं नाही, त्यामुळे त्याने थेट सापाचाच चावा घेतला आणि त्याचे चार तुकडे केले.
संबंधित तरुणाच्या वडिलांनी एएनआयला सांगितलं की, ‘माझा मुलगा नशेत होता. तेव्हा साप अचानक घरात शिरला आणि त्याने माझ्या मुलाचा चावा घेतला. ज्यानंतर माझ्या मुलाने त्या सापाचे तुकडे करून टाकले. सध्या माझ्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही. ‘
राज कुमारवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, ‘ जेव्हा संबंधित रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा आम्हाला वाटलं की, त्याला सापाने चावलं आहे. पण परिस्थिती एकदम विचित्र होती. तसेच त्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेनंतर राजकुमार यांच्या कुटुंबियांनी सापाचे अंत्यसंस्कार केले आहेत.