सहकारी बँकानी शासनाच्या निर्देशानूसार, नियमाच्या चाकोरीमध्ये राहुन कारभार करावा – पालकमंत्री जयंत पाटील…

सांगली – ज्योती मोरे

सहकारी संस्थांच्या माध्यमातून उध्दार व्हावा, यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वैकुंठलाल मेहता यांनी सहकाराचे रोपटे लावले. आता हे सहकाराचे रोपटे वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. विना सहकार नाही उद्धार या ब्रिद वाक्याप्रमाणे समाजाची प्रगती झाली. यापुर्वी सहकारातील अर्बन व नागरी बँका चालविणे हे त्या त्या मंडळांच्या अधिकारात होते. त्यावर नाबार्डचे नियंत्रण होते.

पण सद्यस्थितीत हे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेच्या अधिकारात गेले आहे. तसेच बँकांबाबत धोरणेही बदलत आहेत. त्याप्रमाणे सहकारी क्षेत्रातील बँकांही योग्यरितीने न चालल्यास त्यांचे खासगीकरण होऊ शकते. त्यामुळे सहकारी तत्वावरील बँकांनी शासनाच्या निर्देशानूसार व सूचनांनूसार नियमाच्या चाकोरीमध्ये राहुन कारभार करावा. तरच येत्या काळात सहकारी बँका टिकतील, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्लामपूर येथील विभागीय नुतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्राम देशमुख, प्रांताधिकारी डॉ. संतप खिलारी, तहसिलदार रविंद्र सबनीस, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. डब्ल्यु. कडू-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सहकारामध्ये प्रगतीची मोठी ताकद आहे. सहकारी तत्वावर चाललेल्या संस्थांच्या मध्यमातून विकास तळगाळापर्यंत पोहचविता येतो. सांगली जिल्ह्यानेही सहकाराच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. ही प्रगती कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी सहकार टिकला पाहिजे. यासाठी चाकोरीत राहुनच, अटी शर्तीच्या अधिन राहुन , नियमांचे योग्यरितीने पालन करुन कारभार झाला पाहिजे. जर सहकाराचे खासगीकरण झाले.

तर खासगी यंत्रणा समाजाचे शोषण करतील. सहकार क्षेत्रातील बँका या तळगाळापर्यंत काम करण्यासाठी कार्यरत आहेत. यातीलच एक महत्वाची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने या सर्व बाबींचे पालन करुन चांगली प्रगती साधली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक क्षमता चांगल्या पध्दतीने निर्माण करण्यावर भर दिला आहे.

असे असले तरी जगाच्या पाठीवर ई-बँकिंग आणि आधुनिकीकरणाला जास्त महत्व आहे. येत्या काळात स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी काळानुरुप बदल स्विकारले पाहिजेत. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने इस्लामपूर शहरात उभारलेली विभागीय कार्यालयाची इमारत ही इस्लामपूरच्या वैभवात भर टाकणारी असून या बँकेतून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील.

खासगी बँकापेक्षाही अत्यंत सुदर आणि सुबक किंबहुना त्यापेक्षा चांगली व अत्याधुनिक सोईने युक्त अशी ही वास्तु या ठिकाणी अस्तिवात आली. यासाठी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे मी अभिनंदन करतो. असे सांगून ते म्हणाले, येणाऱ्या काळात बँकेची अशीच प्रगती होत राहिल. आणि समाजाला आर्थिक सक्षम करण्याचे काम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्तऱ केला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या सहा वर्षामध्ये अत्यंत काटेकोरपणा आणि शिस्तबध्दतेने काम करुन बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम केली आहे. तसेच बँकेच्या माध्यमातून सर्वांगिन विकास करण्यासाठी विविध योजनाही राबविल्या आहेत. त्याबरोबर शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील 54 मुलांना परदेशी शिक्षणासाठी 8 कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करुन दिले आहे.

त्याबरोबर जिल्ह्यातील 216 शाखांपैकी 66 शाखांचे आधुनुकीकरण केले आहे. राज्यातील विविध 17 साखर कारखान्यांना कर्जे उपलब्ध करुन दिली आहेत. त्याबरोबर ग्राहक संपर्क अभियान राबवून बँकेच्या सेवांचे विस्तारीकरण केले आहे. बँकेच्या अधुनिकीकरणामध्ये ई-बँकींग विकासीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here