सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्हा हा अनेक कलांसाठी प्रसिद्ध आहे.नाटक,तमाशा,शाहिरी,लावणी,अशा एक ना अनेक कलाक्षेत्रात इथल्या कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे.
याच कला क्षेत्राचा वारसा उराशी बाळगून आपली कला नव्या पिढीमध्ये पर्यायाने विद्यार्थ्यांमध्ये उतरवणाऱ्यांमध्ये कला शिक्षकही कमी नाहीत.
सुभाष सदाशिव शिंदे हे असेच एक ध्येयवेडे कलाशिक्षक. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील मन सक्षम आणि स्रजनशील बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनामध्ये कलाजाणीवा पेरुन त्याला खतपाणी घालून, आपल्या कारकिर्दीत शेकडो कलासक्त विद्यार्थी निर्माण करुन,जतसारख्या दुष्काळी भागात कलेचे रोपटे रुजवण्यामध्ये सुभाष शिंदे सरांचे मोठे योगदान आहे.
या त्यांच्या कार्याची दखल घेत ललित कला केंद्र चोपडा,व भावना बहुउद्देशिय संस्था नाशिकचा राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय ज्ञानज्योती क्रांतीज्योती हे पुरस्कार त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहेत.शिंदे सर हे जत हायस्कूलमध्ये गेली 28 वर्षे आपली सेवा देत आहेत.

त्यांनी भारत स्काऊट गाईड, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात कला शिक्षण या 10वी व 12वी च्या पाठ्यपुस्तकांचे लेखन व रेखाटन केले आहे.राष्ट्रसेवा दल ,अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला,तसेच विविध गौरव अंकांचे सहसंपादन,यांसह आणखी कितीतरी सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात त्यांनी आपल्या कार्याची महत्वपूर्ण मोहर उमटवली आहे. या त्यांच्या कार्याचे जिल्हाभरातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.