रामटेक-तिरोडा महामार्गावर पुन्हा एक बळी…एकविरा मतिमंद शाळेच्या काळजीवाहक महिलेचा मृृत्यू…भरधाव वेगाने धावतात कंपनीची वाहने

राजू कापसे
रामटेक

रामटेक तुमसर महामार्गाच्या अपूर्ण कामाने आज पुन्हा एका महिलेचा बळी घेतला असून दहा दिवसातील दुसरा अपघात आहे.काचूरवाहीकडून एकविरा मतिमंद शाळेतील काळजीवाहक असलेल्या मंगला कैलास बर्वे (४८) रा.लहान गडपायरीजवळ यांचा सिमेंट मिक्सर वाहून नेणार्‍या गाडीखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूटीचालक महिला अपघातात बचावली.


मृतक मंगला कैलास बर्वे या काचूरवाही येथील एकविरा मतिमंद मुलांच्या शाळेत काळजीवाहक म्हणून गेल्या १७ वर्षापासून कार्यरत होत्या.तर सुरज मतिमंद मुलामुलींच्या शाळेत ज्योती ताराचंद कामडे (४२) या स्वयंपाकी म्हणून काम करतात.आज संध्याकाळी आपल्या कर्तव्यावरून ज्योती कामडे यांच्या मायस्र्टो या स्कूटीने क्र.एम.एच.३१ एफ सी १७३० ने दोघीजणी रामटेककडे येत होत्या.

काचूरवाही रस्ता हा तिरोडा- रामटेक महामार्गाला जिथे येऊन मिळतो त्यापासून केवळ ३५०-४०० मिटर अंतरावर हाॅटेल सुर्यासमोर मागून भरधाव येणार्‍या ३० टनी कांक्रिट मिक्सर क्र.सीजी ०४ जे डी ४४७१ हा त्यांच्या अगदी जवळून समोर निघाला.त्याच्या धक्क्याने स्कूटी डळमळून पडली .स्कूटीचालक ज्योती कामडे रस्त्याच्या मधे पडल्या तर मंगला कामडे रस्त्याच्या कडेला पडल्या.त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आवाज देऊन काॅंक्रिट मिक्सर चालकास थांबण्याचा इशारा दिला.

मात्र चालकाने गाडी मागे घेतली आणि उठण्याच्या तयारीत असलेल्या मंगला बर्वे यांच्या डोक्यावरून मिक्सरचे मागील चाक गेले आणि मंगला बर्वे जाग्यावरच ठार झाल्या.लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.ठाणेदार दिलिप ठाकूर,सहायक ठाणेदार दत्ताप्रसाद शेंडगे,वाहतुक शाखेचे मुकेश रामेलवार आणि सहकारी लगेच घटनास्थळी दाखल झाले.मृतक मंगला बर्वेंचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

अपघात होताच चालक वाहन सोडून पळाला.मृतक मंगला बर्वे २००३ पासून एकविरा मतिमंद मुलांच्या शाळेत काळजीवाहक म्हणून कार्यरत होत्या.२०१५ साली शाळेला अनुदान मिळायला सुरूवात झाली.आता पूर्ण वेतन मिळणे सुरू झाल्याने सुखाचे दिवस भोगण्याआधीच त्यांचा असा दुर्देवी मृत्यू झाला.त्यांचेपश्चात पती आॅटोचालक कैलास बर्वे,२ मुले व एक मुलगी असा परिवार आहे.


दहा दिवसातील दुसरा तर पाच महिन्यातील तिसरा बळी —- रामटेक -तिरोडा महामार्गाचे काम जवळजवळ दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू असून अद्यापही बारब्रिक कंपनीद्वारे अतिशय संथगतीने व दर्जाहिन काम केले जात आहे.रस्ताबांधकामात अतिशय अनियमितता असून कराराप्रमाणे कोणतेच काम बांधकाम कंपनीद्वारे केले जात नाही.आता पावसाळा सुरू झाला असून मातीमिश्रीत मुरूम टाकल्याने दुचाकी घसरून तर रोजच अपघात होत असून त्यात अनेकांना अपंगत्व आलेले आहे.

फेब्रुवारी मध्ये किमया हाॅस्पिटलसमोर अपघातात मनसर येथील विवाहित महिलेचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला होता तर १३ जून रोजी नागपुर येथून फिरायला आलेल्यांची कार हाॅटेल गौरव जवळ उलटून नितूसिंग चौहान नावाच्या तरूणीचा जागीच मृत्यू झाला होता तर आज २३ जून रोजी त्याच परिसरात हाॅटेल सुर्यासमोर हा अपघात झाला.बारब्रिक कंपनीचे कार्यालय व मिक्सर प्लॅंट काचुरवाही रस्तालगत फ्युचर पाॅईंट काॅन्वेंटचे मागे आहे.

तेथून हे ३० टन काॅंक्रिट मिक्सर भरलेले वाहन भरवेगाने चालक हाकतात.या महामार्गाचे काम एव्हढ्या संथगतीने कां सुरू आहे याचा खुलासा राष्र्टीय महामार्ग प्राधिकरणने करण्याची मागणी येथील जनतेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here