अमरावती आयुक्‍तांनी केली तारखेडा व इमामनगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या कामाची पाहणी…

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरु असलेल्‍या कामाचा आढावा घेण्‍याकरीता मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांचा शनिवार दिनांक ३० ऑक्‍टोंबर,२०२१ रोजी मौजा तारखेडा व इमामनगर येथे सकाळी ११.०० वाजता पाहणी दौरा आयोजित करण्‍यात आला होता. या पाहणी दौरा दरम्‍यान शहर अभियंता रविंद्र पवार, 

तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, उपअभियंता मधुकर राऊत, प्रमोद इंगोले, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अ‍भियंता जयंत काळमेघ, कपिल ढाले, अजिंक्‍य घोगरे उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेची सविस्‍तर चर्चा व माहिती जाणून घेतली.   

घटक क्र.३ अंतर्गत मौजा तारखेडा सर्व्‍हे क्र.२४ येथे ६० सदानिकाचे बांधकाम सुरु करण्‍यात आले असून त्‍याची पाहणी आज आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी केली. सदर कामाची गती वाढविण्‍याचे निर्देश यावेळी त्‍यांनी दिले. येथील सदनिका ही ९.५९ लक्ष रुपयात मिळणार आहे. या ठिकाणचा ड्रॉ दिनांक १४ ऑक्‍टोंबर,२०२१ रोजी काढण्‍यात आला असून त्‍याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल हे चांगल्‍या दर्जाची निर्मीत होत असून नागरिकांचा सदर घरकुल घेण्‍याबाबत कल वाढत आहे. गुणवत्‍ता पुर्ण व दर्जेदार घरे निर्माण करावी व आर्थिक दृष्‍ट्या कमजोर असणा-या नागरिकांना ख-या अर्थाने आपल्‍या स्‍वत:च्‍या घरात जाण्‍यासाठी या प्रकल्‍पातील कर्मचा-यांनी प्रामाणिक प्रयत्‍न करावा अश्‍या सुचना यावेळी आयुक्‍तांनी दिल्‍या.

घटक क्र.४ अंतर्गत इमामनगर येथे वैयक्तिक स्‍वरुपातील घरकुल बांधण्‍यात आले असून त्‍याची प्रत्‍यक्ष पाहणी आयुक्‍तांनी केली. इमामनगर परिसरात एकुण ७१ लाभार्थ्‍यांना घरकुलासाठी मंजुरी प्रदान करण्‍यात आली असून मंजुर प्रकल्‍पानुसार ५४ लाभार्थ्‍यांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. या ठिकाणच्‍या घरांना शासकीय अनुदान देण्‍यात आले आहे. सदर परिसरातील लाभार्थ्‍यांनी यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या कामकाजाबाबत समाधान व्‍यक्‍त केले.

शासनाने ख-या अर्थाने आम्‍हाला सहकार्य केल्‍याची भावना यावेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केली. आयुक्‍तांनी यावेळी सुचना दिल्‍या की, ज्‍या लाभार्थ्‍यांना अजून निधीचा टप्‍पा मिळाला नसेल त्‍यांना त्‍वरीत उपलब्‍ध करुन देण्‍यात यावा. लालखडी परिसरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्‍यांना लाभ मिळाला आहे. यावेळी त्‍यांच्‍या चेह-यावर समाधान दिसून आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here