अमरावती मनपा आयुक्त शाई फेक प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडीत जबर मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप…

फोटो - सौजन्य गुगल

अमरावतीचे मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याच्या प्रकरणी ५ आरोपी व युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते यांना पोलीस कोठडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. याची न्यायाधीशांकडे तक्रार दाखल केली असून न्यायालयाने पुन्हा वैद्यकीय तपासणीचे दिले आदेश आहे. त्या पाचही जणांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अजून रुग्णालयाचा अहवाल येणे बाकी आहे.

शाई फेकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी बडनेराचे आमदार रवि राणा यांना सहआरोपी केले आहे. या घटनेमुळे खासदार असलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत राणा जाम चिडल्या होत्या त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा हात असल्याचा त्यांचा आरोप आहे. शुक्रवारी संसदेतही त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यानंतर आज, शनिवारी अमरावतीत परतल्यानंतर या प्रकरणाची केंद्रीय चमूकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, पोलिसांवरही मनमानीचा आरोप केला आहे.

तर खासदार नवनीत राणा यांनी अटक केलेल्या आरोपींना त्यांनी रुग्णालय व पोलिस ठाण्यात जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही. त्याचवेळी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत आयुक्तांनीही भेट नाकारली होती.

मंगळवार,दि. ९ रोजी मनपा आयुक्तांवर हल्ला व शाई फेकल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी कलम ३०७ नुसार (तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न) आमदार रवी राणांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच जण संदीप गुल्हाने, अजय बोबडे, विनोद येवतीकर, महेश मुलचंदानी व सूरज मिश्रा यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर पाचही आरोपींना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता आरोपींनी पोलीस कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याचे न्यायालात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here