आकोट सत्र न्यायालयाने पारीत केला तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी श्याम नाठे विरूध्द बगर जमानती अटक वॉरन्ट…

फोटो -सांकेतिक

वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कार यांनी बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी श्याम नाठे रा. रामटेक पूरा आकोट, याचे विरूध्द बगर जमानती अटक वॉरन्ट चा आदेश पारित केला आहे.

तुषार पुंडकर हत्याकांड प्रकरणात आकोट शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींविरूद्ध अप.क्र. ८०/२०२० ३०२,१२०,१२०- ब. २०१, ३४ भा.दं.वि सहकलम ३/२५, ५/२७, ७/२७ आर्म अॅक्ट सह नियम ४७/१७७,१३०(१)(२)/१७७, ३/१८१ मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

विद्यमान मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठाने या प्रकरणातील आरोपी श्याम नाठे याला मिळालेला जमानत आदेश रद्द केला होता. त्यावर या प्रकरणी विद्यमान अकोट सत्र न्यायालयाने आरोपीला आपलेसमोर हजर राहण्याकरिता व त्याला ताब्यात घेवून कारागृहात पाठविण्याकरिता १३.०५.२०२२ पर्यंत मुदत दिली होती. परंतू, आरोपीने वरील प्रकरणात वि. उच्च न्यायालयातील जामीन रद्द झाल्यानंतर पुन्हा वि. अकोट सत्र न्यायालयात हजर राहण्याकरिता (सरेन्डर करण्याकरिता) वेळ वाढवून मागितला. परंतु या अर्जावर सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी लेखी उत्तर सादर करून युक्तिवाद केला कि, वरील प्रकरणात वि. आकोट सत्र न्यायालयाने आरोपीला यापूर्वीच १३.०५.२०२२ पर्यंत मुदत दिलेली आहे. आणि वि. उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपिठाने यापूर्वीच वरील आरोपीचा जमानत अर्ज रद केला आहे. त्यानुसार आरोपीने आज वि. आकोट सत्र न्यायालयात हजर राहणे सक्तीचे होते. त्याकरिता वरील आरोपीला वेळ वाढवून न देता त्याला ताब्यात घेऊन अकोला कारागृहात पाठविण्यात यावे.

यावेळी दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर वि. न्यायालयाने वरील प्रकरणातील आरोपी श्याम नाठे याचे विरुद्ध बिगर जमानती वॉरन्ट जारी करण्यासंबंधीचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे वरील प्रकरणात पोलीसांना या आरोपीला अटक करून विद्यमान अकोट सत्र न्यायालयात आणावे लागणार आहे. वाचकाना स्मरतच असेल कि, तुषार पुंडकर खून खटला आकोट सत्र न्यायालयात चालविणेकरिता शासनाचे विशेष सरकारी वकिल म्हणून प्रख्यात विधीज्ञ ऊज्वल निकम यांना नियुक्त केलेले आहे. त्यांचे मार्गदर्शनात आकोट येथिल सरकारी वकिल विधीज्ञ अजित देशमुख हे खटल्याचे कामकाज पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here