अकोला जिल्हा परिषद ‘अब खेला होबे’ जिल्हा परिषदच्या दोन सभापतींच्या निवडणूकीचा ‘पिक्चर अभी बाकी है’…

फोटो- सौजन्य गुगल

अकोला जिल्हा परिषदेच्या रिक्त दोन सभापतीपदांसाठी २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेली विशेष सभा आणि त्यामध्ये करण्यात आलेल्या दोन सभापतींच्या निवडीची सभा बेकायदेशीर झाल्याने त्याला आव्हान देणारी याचिका जिल्हा परिषद सदस्य सौ नीताताई संदिप गवई यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे २ नोव्हेंबर रोजी दाखल केली. या याचिकेवर १६ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार असून, त्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा अध्यासी अधिकारी महिला बालकल्याण सभापती स्फूर्ती गावंडे, विषय समिती सभापती सम्राट डोंगरदिवे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीनंतर रिक्त पदांवर दोन सभापतींची निवड करण्यासाठी गत २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची नोटीस २१ ऑक्टोबर रोजी जावक नंबर द्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १११ (४) अन्वये विशेष सभेची पूर्ण दहा दिवसांची नोटीस सदस्यांना मिळणे बंधनकारक आहे;

अर्थात नोटीस काढण्याचा दिवस आणि सभेचा दिवस वगळून हे दहा दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष सभेच्या नोटीसवर स्वाक्षरी केली असून, ही नोटीस सदस्यांना आवक जावकव्दारे २१ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आली.याशिवाय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १११ (४) अन्वये विशेष सभेची नोटीस पूर्ण १० दिवसाची नोटीस प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना मिळणे बंधनकारक आहे. परंतू जिल्हाधिकारी अकोला यांनी काही जिल्हा परिषद सदस्यांना ता. २२, २३, २४, २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी विषय समिती सभापती निवडणुकीच्या विशेष सभेची नोटीस बजावली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १११ (४) चा भंग झाला असल्याचे याचिकेमध्ये नमुद केले आहे. त्यामुळे या नोटीसला २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण दहा दिवस होत नसल्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेली विशेष सभा गैरकायदेशीर असून ही विशेष सभा रद्द करण्यात यावी आणि त्यामध्ये महिला व बालकल्याण सभापतीपदी स्फूर्ती गावंडे आणि विषय समिती सभापतीपदी सम्राट डोंगरदिवे यांची करण्यात आलेली निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका जिल्हा परिषद सदस्य सौ नीताताई संदीप गवई यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाखल केली. या याचिकेवर १६ नोव्हेंबर रोजी आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here