अकोला | पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ‘रिक्त बेड माहिती वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेचे अनावरण संपन्न…

अकोला, दि.१ में (जिमाका) – कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाची स्थिती, उपलब्ध ऑक्सिजन बेड व इतर माहिती दर्शविणारे वेब पोर्टल व जिल्ह्यातील स्वस्त औषध स्थिती दर्शविणारे जेनरीक आर्क मोबाईल ॲपचे अनावरण पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात वेब पोर्टल व मोबाइल ॲपचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण तसेच प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

कोविड-१९ अकोला (covid19akola.in) या वेब पोर्टलवर जिल्ह्यातील नागरिकांना कोविड रुग्णालयाची तसेच रुग्णालयातील जनरल वार्डातील बेड, ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेड उपलब्धतेबाबत माहिती दर्शविण्यात येणार आहे. https://covid19akola.in ही वेब पोर्टलची लिंक असून त्यावर क्लिक करुन रुग्ण स्थिती पाहता येणार आहे. ही माहिती रोज अपडेट होणार आहे.

तसेच स्वस्त औषध स्थिती दर्शविणारे जेनरीक आर्क मोबाईल ॲपद्वारे आवश्यक औषधांची मागणी, डॉक्टरांची अपॉईंटमेंट, चाचणी सेंटर व इतर माहिती प्राप्त होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी यावेळी दिली. या वेब पोर्टल व मोबाईल ॲपचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here