रविकांत तुपकरांच्या आक्रमकतेपुढे अकोला जिल्हा प्रशासन नरमले…

अखेर विमा प्रतिनिधी सपकाळ यांची उचलबांगडी… तर शेतकऱ्यांना लवकरच मिळणार ५ कोटी रुपये विम्याची रक्कम

मनोहर निकम महाव्हाइस न्यूज ब्युरो

अकोट तालुक्यात केळी व फळबागांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीने तोंडाला पाने पुसली. दोनशे, पाचशे रुपयांचे मदतीचे धनादेश हातात टेकवून भलावण केल्या गेली. याविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी अकोट तालुक्यातील पणज व अकोली जहाँगीर महसूल मंडळातील गावांमधील शेकडो शेतकरी आज (ता.22 मार्च 2021) रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेत नुकसान भरपाई तसेच विमा कंपनीच्या संबंधित प्रतिनिधीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रेटली.आंदोलकांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातच ठांण मांडल्याने एकच खळबळ उडाली..! आंदोलकांनी सोबत आणलेल्या भाकरी आवारतच खाल्या..न्याय मिळेपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने पोलीस ही चक्रावले..

आंदोलकांच्या भावना लक्षात घेता जिल्हाधिकारी पापळकर यांनी सभागृहात तातडीची बैठक घेत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर, रविकांत तुपकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी निलेश अपार उपस्थित होते. सभागृहात व सभागृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

या बैठकीत तुपकरांची आक्रमकता लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांची भारतीय कृषी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे केले. त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी दामोदर सपकाळ यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी कुंदन बारी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्यासाठी 8 दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले..

विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना तोकडी विम्याची रक्कम मिळाली त्या 25 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे धनादेश परत करून विमा कंपनीचा निषेध व्यक्त केला..सन 2019-2020 च्या हंगामात वेगाच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले त्यासाठी विमा कंपनीने नुकतीच मदत जाहीर केली आहे. या यादीत 264 रुपयांपासून मदत जाहीर करण्यात आल्याने शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत.

हेक्टरी 8800 रुपयांचा विमा प्रिमीयम भरलेला असताना कंपनीने दोनशे, पाचशे रुपये देऊन फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त करीत होते. त्यामुळे याविरुद्ध केळी उत्पादक पट्टयातील रुईखेड, पणज, अकोली जहाँगीर, महागाव, बोचरा, कारला, दिवठाणा, अकोलखेड, रुद्धडी, वडाळी देशमुख आदी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध दाद मागितली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here