उद्यापासून अकोला जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता…अशी आहे नियमावली…

फोटो - फाईल

अकोला, दि.३१(जिमाका)- कोविड संसर्गास प्रतिबंध करत त्याचा फैलाव होऊ नये याची खबरदारी घेऊन जिल्ह्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्‍वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्‍यांचे संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग व टप्प्याटप्प्याने वसतीगृहे मंगळवार दि.१ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु करण्‍याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मान्यता दिली असून त्यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात नियमावलीही जारी करण्यात आली आहे.

नियमावली याप्रमाणे-

(१) ज्यांनी कोविड १९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा विद्यार्थी/ विद्यार्थिनींना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तथापि, लसीकरण (दोन्ही डोस) न झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी.

(२) विद्यापीठे/महाविद्यालयांच्या दि.१५ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या. तद्नंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्यास्तरावर निर्णय घ्यावा. विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा विद्यार्थी अथवा त्याचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा आरोग्यविषयक इतर समस्यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्याची ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने पुनःपरीक्षा घ्यावी. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठांशी संलग्नित काही भागात नेटवर्क सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्याच्या परीक्षा घेण्यात याव्या.

(३) परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठे/महाविद्यालयांनी हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच हेल्पलाईन नंबर, इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करून दयावी.

(४)विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.

(५) ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी कोव्हिड १९ची लस घेतलेली नाही. त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख/ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे.

(६) अकोला जिल्ह्यातील सुरु होणाऱ्या सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी कोव्हिड १९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने तसेच या कार्यालयाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्त्वे किंवा मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here