आई, वडिल आणि तरुण मुलाच्या निधनाने ऐनशेत गावावर शोककळा…

वाडा – देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढती आहे. अगदी चालती-बोलती आणि तरुण माणसेही या महामारीचे बळी ठरताहेत. अनेक कुटूंबं अक्षरशः उध्वस्त होत आहेत.अशीच घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत येथे घडली आहे. एकाच कुटूंबातील आई-वडिल, मुलगा, सून व लहान मुलं असे संपूर्ण कुटूंबच कोरोनाने बाधित झाल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी ऐनशेत येथील ठाकरे कुटूंबातील सविता सदानंद ठाकरे यांचं कोरोनाने अकाली निधन झालं.

याचवेळी त्यांचे पती व मुलगाही रुग्णालयात उपचार घेत असतांनाच सविता ठाकरे यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी २२ एप्रिल रोजी रोजी त्यांच्या ३४ वर्षीय मुलाचा सागर सदानंद ठाकरे यांचा मृत्यू झाला तर मुलाच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी दि. १ मे रोजी रुग्णालयात उपचार घेत असलेले सागरचे वडिल सदानंद भास्कर ठाकरे यांचेही दुर्देवी निधन झाल्याने ठाकरे कुटूंबातील आई-वडिल आणि मुलगा यांच्या एकाचवेळी जाण्याने ठाकरे कुटूंबावर व ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे.

मयत सदानंद ठाकरे हे कृषी खात्यातून तीन वर्षांपूर्वी चालक म्हणू्न सेवानिवृत्त झाले होते. तर सागर हा बी.एस्सी.अॉग्रिकल्चरची पदवी घेऊन कृषी खात्यातच कंत्राटी पद्धतीने सेवेत होता व स्वत:चा नर्सरीचा व्यवसायही करत होता. परंतु कोरोना महामारीने या सुखी आणि सधन कुटूंबावरच घाला घालून संपूर्ण कुटूंबच उध्वस्त केले.
त्यांच्या पश्चात सागरची कोरोनावर मात करुन परतलेली सुविद्य पत्नी व दोन लहान मुले असा परिवार उरला आहे.

ठाकरे परिवारातील एकाच कुटूंबातील शांत, सुस्वभावी अशा तीन व्यक्तींच्या जाण्याने ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्देवी घटनेबाबत संपूर्ण वाडा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here