राष्ट्रीय युवा महोत्सवात संदेश विद्यालय अँड ज्युनि.कॉलेजच्या आदिती सातपुतेचा द्वितीय क्रमांक…

धीरज घोलप

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी २४वा राष्ट्रीय युवा महोत्सव (YUVAAH) दि.१२ ते १६ जानेवारी २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

महोत्सवाचे उदघाटन नवी दिल्ली येथील संसद भवनातील सेंट्रल हॉल मध्ये लोकसभेचे अध्यक्ष मा.श्री.ओम बिर्ला, केंद्रीय शिक्षण मंत्री मा.श्री.रमेश पोखरीयाल आणि केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री मा.श्री.किरण रिजीजू यांच्या उपस्थित झाले. यावेळी प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी युवकांना व्हर्चुअल माध्यमातून मार्गदर्शन केले.

या महोत्सवात भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रथम क्रमांक प्राप्त कलाकारांनी एकूण २५ कला प्रकारांत आपल्या कलेचे सादरीकरण व्हर्चुअल (ऑनलाईन) माध्यमातून केले.या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्क साईट, विक्रोळी(पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनि.कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्सच्या आदिती पोपट सातपुते (इ.१२वी),

हिने शास्त्रीय संगीत-वाद्यवादन (हार्मोनियम) या कला प्रकारात संपूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक पटकावला असून सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुयश संपादित करत तिने आगळीवेगळी हॅट्रिक साधून कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी नवी दिल्ली व मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सवात तिने सुयश संपादित केले होते.

आदिती सातपुतेने संपादित केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.श्री.सुनील केदार व मुंबई विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक मा.श्री.संजय महाडीक यांनी दूरध्वनीवरून तिचे विशेष कौतुक केले आहे.

तसेच ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी आदिती सातपुते व तिला मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे, भूषण मोकल, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी सुयश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here