धान खरेदी केंद्रावरील ग्रेडर एसीबीच्या जाळ्यात…भंडारा एसीबीची कारवाई…वाचा कुठे झाली कारवाई…

भंडारा : धान खरेदी करण्यासाठी मोबदला म्हणून १,५०० रुपयाची लाच स्वीकारताना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील ग्रेडरला रंगेहात अटक केली. ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कांद्री येथे भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारला सायंकाळी केली.


◆ संजय नारायण उरकुडे (३२) असे एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केलेल्या ग्रेडचे नाव आहे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. या केंद्रांतर्गत परिसरातील गावातील शेतकरी धान विक्रीसाठी नेतात. जांब येथील एका तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या चार एकर व काकाच्या नावे असलेल्या

दोन एकर शेतातील २१० पोते धान कान्द्री येथील केंद्रावर विक्रीसाठी नेले होते. यावेळी ग्रेडर संजय उरकुडे यांनी १८० धानाचे पोते खरेदी केले. उर्वरित ३० पोते खरेदी करण्यास त्याने नकार दिला. यामुळे तक्रारदाराने ग्रेडरला विनवणी केली. ग्रेडरने त्याचा मोबदला म्हणून १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.


◆ मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नोंदविली. या तक्रारीवरून भंडारा येथील एसीबीचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने कांद्री येथील धान्य खरेदी केंद्रावर गोपनीयरित्या शहानिशा केली. त्यात ग्रेडर संजय उरकुडे याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

यावरून भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कान्द्री येथील धान खरेदी केंद्र परिसरात सापडा रचला. दरम्यान, १३ हजार रुपयांवरून लाचेची रक्कम तडजोडीअंती एक हजार ५०० रुपयांवर पक्की झाली. ही लाचेची रक्कम स्वीकारताना संजय उरकुडे याला रंगेहात ताब्यात घेतले.

याप्रकरणी उरकुडे याच्याविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, भंडाऱ्याचे पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कोमलचंद बनकर, सचिन हलमारे, पोलीस शिपाई कृणाल कढव, सुनील हुकले, चालक दिनेश धार्मिक यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here